Friday, April 26, 2024
Homeनगरलोणी पोलिसांकडून ‘बिहार’ स्टाईल दादागिरी

लोणी पोलिसांकडून ‘बिहार’ स्टाईल दादागिरी

लोणी |वार्ताहर| Loni

लोणी पोलीस ठाणाच्या हद्दीत अवैध धंद्यांची त्सुनामी आलेली असताना त्याविरुद्ध कारवाईचे धाडस दाखवण्यापेक्षा कायदा पाळणार्‍या निरपराध नागरिकांवर दादागिरी करून खोट्या केसेस दाखल करण्यासाठी धडपडणार्‍या लोणीच्या ‘त्या’ दोन पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची तत्परता अधिकार्‍यांनी दाखवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

- Advertisement -

पोलीस हे जनतेचे मित्र आणि सेवक आहेत याचा विसर काही पोलीस कर्मचार्‍यांना पडल्याचे मंगळवारी लोणी बुद्रुक गावात घडलेल्या एका घटनेने अधोरेखित केले. ही घटना दिसताना छोटी वाटत असली तरी ती महाराष्ट्र पोलिसांची नवी ‘बिहार’ स्टाईल म्हणून पहिली जात आहे. घटना अशी आहे की, मंगळवार दि. 9 मे रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास लोणी बुद्रुक गावातील ‘विखे’ आडनावाचा एक शेतकरी शेतातील काम आटोपून आपल्या दुचाकीवरून लोणी-दाढ रस्त्याने घराकडे जात होता.

गावातील प्रतिष्ठित पण विनम्र स्वभावाची ही व्यक्ती ओम गुरुदेव मंगल कार्यालयजवळ आली असता पाठीमागून दोन पोलीस कर्मचारी दुचाकीवरून आले .त्यांनी या शेतकर्‍याची दुचाकी अडवली आणि तू दारू पिऊन गाडी चालवतो म्हणून त्याला दमदाटी केली. त्याला काहीच कळत नव्हते. पोलीस वर्दी घातलेले दोघे जण आपल्याशी असे का वागत आहेत? असा प्रश्न त्याला पडला.

तेवढ्यात एका पोलीस कर्मचार्‍याने त्याच्या दुचाकीची चावी काढून घेतली. दुसर्‍याने त्याला स्वतःच्या दुचाकीवर बसवले. त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला. मला तुम्ही कुठे घेऊन जात आहेत अशी विचारणा ही व्यक्ती करीत असताना गप्प बसून रहा म्हणून पोलीस कर्मचार्‍याने दुचाकी गावाच्या दिशेने नेली. शेतकर्‍याला वाटले पोलीस ठाण्यात नेतील पण तसे न करता लोणीच्या शासकीय ग्रामीण रुग्णालय परिसरातील झाडांच्या अंधारात दुचाकी थांबली. दहा-पंधरा मिनिटे दुसरा पोलीस कर्मचारी आला नाही.

तोपर्यंत एकजण मोबाईलवर बोलत होता. नंतर दुसरा कर्मचारी आला. त्यांनी या शेतकर्‍याला ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे काही वेळ उभे ठेवले. नंतर काही कागद आणून त्यावर शेतकर्‍याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर टाकून त्याच्या सह्या आणि अंगठे सुद्धा घेतले. हतबल झालेला हा शेतकरी सुन्न होऊन पोलिसांचा हा अतिरेक उघड्या डोळ्यांनी बघत होता. शेतकरी त्यासाठी एवढे सगळे करावे लागले त्याबद्दल चकार शब्द काढीत नसल्याने ते दोघे एकमेकांशी आपसात बोलून आता काय करायचे एवढीच चर्चा करीत होते. अडचण हीच होती की, शेतकरी दारू पिलेला नाही. त्याची वैद्यकीय तपासणी केली तर अहवाल निल येईल. मग केस करता येणार नाही.

शेवटी त्यांचं ठरलं.. त्यांनी शेतकर्‍याचा मोबाईल परत दिला आणि तुम्ही तुमच्या जवळच्या एका व्यक्तीला बोलावून घ्या म्हणून सांगितले. शेतकर्‍याने आपल्या शेजारच्या ‘विखे’ आडनावाच्या एका व्यक्तीला फोन करून बोलावून घेतले. काही वेळातच धावपळीत ती व्यक्ती आली. पोलिसांनी त्या दोघांच्या मोबाईलमध्ये एक फोटो घेतला आणि त्यांना काही प्रश्न विचारण्याआधीच ते दोघे पोलीस कर्मचारी निघून गेले.

दिवसभर उन्हात कष्ट करून आलेल्या व्यक्तीला कोणतीही चूक नसताना पोलिसांनी ज्या पद्धतीने दोन तास मानसिक त्रास दिला त्यांच्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार? लोणी बुद्रुक सारख्या शांत, संयमी नागरिकांच्या गावात पोलिसांची ही कार्यपद्धती गावाच्या शांततेला गालबोट लावण्यास कारणीभूत ठरली तर? खोट्या केसेस दाखल करून पोलिसांना नेमके काय साध्य करायचे आहे? मंगळवारची घटना ज्या व्यक्तीसोबत घडली ती व्यक्ती अतिशय संयमी आहे.

पण पोलिसांनी यातून धडा घेतला नाही तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. दै. सार्वमत प्रतिनिधींशी बोलताना त्या व्यक्तीने आपल्या सह्या घेतलेल्या कागदांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ते कागद मला परत मिळाले पाहिजेत अशी मागणी करतानाच मिळाले नाही तर पुढे काय करायचे ते लवकरच ठरविल, असे सूचक वक्तव्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या