Monday, April 29, 2024
Homeनगरलोणी खुर्द ग्रामपंचायतीचे जनार्दन घोगरे होणार सरपंच

लोणी खुर्द ग्रामपंचायतीचे जनार्दन घोगरे होणार सरपंच

लोणी |वार्ताहर|Loni

राहाता तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या लोणी बुद्रुक व खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी फारशी रस्सीखेच दिसत नाही.

- Advertisement -

लोणी खुर्द ग्रामपंचायतीत परिवर्तन मंडळाला बहुमत असून सरपंच पदासाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडून आलेले जनार्दन चंद्रभान घोगरे हेच सरपंचपदी विराजमान होणार हे निश्चित आहे तर लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव झाल्याने तीन महिला दावेदार आहेत.

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द व लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी गुरुवारी आरक्षण जाहीर झाले. त्यात लोणी खुर्द नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष व लोणी बुद्रुक नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री यासाठी आरक्षित झाले. लोणी खुर्द ग्रामपंचायतीत ज्येष्ठ कार्यकर्ते एकनाथ घोगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन मंडळाने 17 पैकी 11 जागा जिंकून बहुमत मिळवले. या मंडळाने जनार्दन घोगरे पाटील यांना सरपंच म्हणून प्रारंभीपासूनच जाहीर करीत निवडणुकीत मतं मागितली. आता आरक्षण जाहीर झाले आणि ते याच प्रवर्गातून निवडून आलेले असल्याने तेच सरपंचपदी विराजमान होणार हे स्पष्ट झाले आहे.

लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीची यावेळीही निवडणूक बिनविरोध झाली. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी एकोप्याची भूमिका घेत निवडणूक बिनविरोध केली.

काल सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री यासाठी सरपंच पद आरक्षित झाले. या प्रवर्गातून कल्पना विठ्ठल मैड, सुनीता गोरक्षनाथ चव्हाण आणि कविता गोरक्ष दिवटे या तीन महिला बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. यातील मैड आणि चव्हाण मागील सदस्य मंडळात होत्या व त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

कविता दिवटे पहिल्यांदाच सदस्य बनल्या आहेत. आ. विखे पाटील ठरवतील त्यांच्याच गळ्यात सरपंचपदाची माळ पडणार आहे. मात्र उपसरपंच पदासाठी पाच जण दावेदार असून उपसरपंच खुल्या प्रवर्गातील होणार असल्याने त्याकडे गावाचे लक्ष लागले आहे. हे पाचही दावेदार पहिल्यांदाच ग्रामपंचायत सदस्य झाले आहेत.

लोणी बुद्रुक गाव लोकसंख्येने मोठे आहे. या गावाचा देश पातळीवर अनेकदा गौरव झाला आहे. ग्रामपंचायतीने शासनाच्या विविध योजना व स्पर्धांमध्ये सहभागी होऊन देश व राज्य पातळीवरील सर्व महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या