लोहारे-मिरपूर येथे ऑक्सिजन रिफिलींग केंद्रास पेसोची मान्यता

jalgaon-digital
3 Min Read

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

करोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता या रुग्णांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील लोहारे – मिरपूर येथील ऑक्सिजन रिफिलिंग केंद्रास पेसो कडून तातडीची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या ऑक्सिजन रिफिलिंग केंद्रास सातशे ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध होणार आहेत. थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी सदर ऑक्सिजन रिफिलिंग सेंटरला भेट देत पाहणी केली.

संगमनेर तालुका व परिसरातील करोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने विशेष पाठपुरावा केला आहे. वाढीव ऑक्सीजन सिलेंडर उपलब्धतेसाठी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी लोहारे – मिरपूर येथील ऑक्सिजन रिफिलिंग सेंटरला भेट देत पाहणी केली. प्रसंगी सदर ऑक्सिजन रिफिलिंग केंद्रास संचालक भाऊराव जोंधळे, डॉ. संदीप पोकळे, भाऊराव कदम, कृष्णा पोकळे उपस्थित होते. महसूलमंत्री थोरात यांनी संगमनेर येथे करोना आढावा बैठकीत ऑक्सीजन पुरवठादार राम सुरेश जाजू यांना बोलावून या कामी सूचना दिल्या होत्या.

अहमदनगर शहरातही तातडीने ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबवून शहरातील रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. याचबरोबर तळेगाव भागातील लोहारे – मिरपूर येथे कार्यरत असलेले ऑक्सिजन रिफिलिंग सेंटर काही तांत्रिक अडचणीमुळे बंद होते. त्यामुळे थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी तांत्रिक अडचणी समजून घेत मंत्रालयीन स्तरावर त्याचा पाठपुरावा केला. याबाबत महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी पेसोकडून तातडीची मंजुरी मिळून दिली असून त्यामुळे उद्योगांना ऑक्सिजन देण्याऐवजी हा ऑक्सिजन पुरवठा शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्णांना पुरविला जाणार आहे.

लोहारे ऑक्सिजन रिफिलिंग केंद्रास भेटी प्रसंगी इंद्रजित थोरात म्हणाले, करोना हे मानवावरील संकट आहे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे करोना उपाययोजनांचा दररोज आढावा घेत असून ऑक्सिजनची व्यवस्था सुरळीत करण्याकरता त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. लोहारे – मिरपूर येथील रीफिलिंग सेंटरमुळे आपल्या परिसरातील शासकीय व खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन मिळणार असून याचा लाभ थेट रुग्णांना मिळणार आहे.

लोहारे रिफीलिंग सेंटरचे संचालक भाऊराव जोंधळे म्हणाले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे कायम संकटामध्ये जनतेच्या सोबत राहिले आहेत. करोना संकटात संगमनेर तालुक्यातील व परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी महसूलमंत्री थोरात यांच्या सूचना असून त्यांच्यामुळेच पेसोमार्फत ऑक्सिजन रिफिलिंग केंद्रास ही तातडीने मंजुरी मिळाली आहे. आपणही अतिशय जलद व कार्यक्षम पद्धतीने काम करणार असून जास्तीत जास्त ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देऊ असेही श्री. जोंधळे यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *