लॉकडाऊनमुळे नाशकात अडकलेल्या विद्यार्थ्यांची आत्महत्या; रावेर तालुक्यात शोककळा

jalgaon-digital
2 Min Read

रावेर/नाशिक | जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील विद्यार्थ्यांने नैराश्यातून  राहत्या खोलीत आत्महत्या केल्याची घटना आज  सकाळच्या सुमारास सातपूर परिसरात घडली.  रुपेश भरत पाटील (वय-२२) असे या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलं शिक्षणासाठी नाशिकला होती, लाँकडाऊनमुळे  परवानगी न मिळाल्याने मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप मुलाच्या नातलगांनी केला आहे.

अधिक माहिती अशी की, रावेर येथील पाल रोडवर श्रीराम पाटील यांच्या फॅक्ट्रीमध्ये वास्तव्यास असलेल्या भरत पाटील यांची रुपेश व मयुर ही दोन मुले उच्च शिक्षणासाठी नाशिक शहरातील एनडीएमव्हीपी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. ते पुष्पराज अॅनेक्स, पाईपलाईन रोड, नाईस वजन काट्याजवळ गुलमोहर विहार कॉलनी सातपूर येथे खासगी वसतीगृहात राहत होते.

कोरोना व्हायरसच्या शिरकावानंतर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी जिल्हाबंदी केल्यामुळे शहरात अडकून पडले आहेत.

यातीलच रुपेश व त्याचा भाऊ मयुर भरत पाटिल हे होते. त्यांचे जेवणाचे हाल होत असल्याचे त्याच्या नातेवाईकांना समजले. यानंतर त्याच्या नातेवाईकांनी १४ एप्रिल रोजी जळगाव पोलिसांना मुलांना घ्यायला जाऊ देण्याबाबत परवानगीचा अर्ज करण्यात आला होता. मात्र, जळगाव पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हा विद्यार्थी तणावात होता. कुटुंबातही यामुळे अस्वस्थता होती.

आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घरतील फँनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर रुपेशच्या भावाने याबाबतची माहिती सातपूर पोलिसांना दिली. घटनास्थळी सातपूर पोलीस दाखल झाले तत्पुर्वीच नागरीकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

वैदकिय अधिकार्‍यांनी  तपासून मृत घोषीत केले.  याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान लाँकडाऊन व घरी जाण्यास परवानगी न मिळाल्याच्या नैराश्यातुनच त्याने आत्महत्या केल्याचे आरोप त्याच्या कुटुंबियांनी केले आहेत. तर ही आत्महत्या लाँकडाऊनमुळे नसून वैयक्तीक काणातून असल्याचा दावा सातपुर पोलिसांनी केला आहे.

तर रुपेश वाचला असता…

मयत रुपेश याच्या वडिलांनी मुलांना घरी आणण्यासाठी जळगांव पोलीस अधीक्षक यांच्याकडे १४ एप्रिल रोजी अर्ज सादर केला होता. मात्र पोलिसांनी परवानगी न दिल्याने रुपेशने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. जर पोलिसांची परवानगी मिळाली असती तर रुपेशचा जीव वाचला असता असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

Share This Article