करोना संकट : दिल्लीत लॉकडाऊन पुन्हा वाढवला

दिल्ली l Delhi

देशात करोनाचा हाहाकार माजला आहे. राजधानी दिल्लीतही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा लॉकडाऊन एक आठवडा वाढवण्यात आलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे.

१७ मेपर्यंत दिल्लीतील लॉकडाऊन असणार असून निर्बंध आणखी कडक करण्यात आल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. या आठवडाभराच्या लॉकडाऊनमध्ये मेट्रो सेवाही बंद करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसात रुग्णांच्या संख्येत २३ ते ३५ टक्क्यांनी घट झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं.

केजरीवाल बोलतांना म्हणाले, ‘दिल्लीमध्ये सर्वात मोठी अडचण ऑक्सिजनमध्ये येत होती. सामान्य दिवसांमध्ये जेवढ्या ऑक्सिजनची गरज पडते, त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त ऑक्सिजनची गरज पडू लागली. हायकोर्टा, सुप्रीम कोर्टाचे आदेश आणि केंद्राच्या सहयोगाने दिल्लीमध्ये ऑक्सिजनची स्थिती सुधारली आहे. पहिले असे ऐकायला मिळत होते की, या रुग्मालयात 2 तासांसाठी ऑक्सिजन राहिले, त्या रुग्णालयात ३ तासांसाठी ऑक्सिजन राहिले. मात्र आता अशी स्थिती नाही.’

तसेच, ‘दिल्लीमध्ये लसीकरणाला मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणाची मोठी आणि उत्कृष्ट तयारीही करण्यात आली आहे. लसीकरणात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. राजदानी दिल्लीमध्ये सध्या लसींचा तुटवडा आहे. मात्र, केंद्र सरकार आम्हाला मदत करेल, असा विश्वास यावेली केजरीवाल यांनी व्यक्त केला. येत्या ३ महिन्यांमध्ये सर्वच वयोगटांतील दीड कोटी दिल्लीकरांना लसीकरण पूर्ण करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. मात्र त्यासाठी दिल्लीला केंद्राकडून दररोज ३ लाख म्हणजेच एकूण ३ कोटी डोस लागतील,’ असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले.