Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकपथविक्रेत्यांना कर्जवाटप

पथविक्रेत्यांना कर्जवाटप

सटाणा । प्रतिनिधी Satana .

शहरातील फेरीवाल्यांकरता राबवण्यात येत असलेल्या केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या लाभार्थ्यांना बँकेमार्फत १० हजार रुपये कर्ज वितरीत करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

- Advertisement -

करोना प्रादुर्भावामुळे भाजीपाला, फळे, तयार खाद्यपदार्थ, चहा, भजी, पाव, पापड, चप्पल आदी उत्पादित वस्तू तसेच रस्त्यावरील चर्मकार यांच्यासह इतर व्यवसाय करणार्‍या नागरिकांना उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता.

या विक्रेत्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळते भांडवल उपलब्ध करण्यासाठी सदर योजना केंद्र शासनाने बँकेच्या सहकार्याने सुरू केली असल्याची माहिती नगराध्यक्ष मोरे यांनी दिली.

शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झालेअसून प्राप्त यादीमध्ये सद्यस्थितीत ८१८ लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे. त्यानुसार फिरते छोटे व्यवसाय करणारे व्यावसायिक यांना बँकेकडून १० हजार रुपये रकमेपर्यंत खेळते भांडवली कर्जपुरवठा करण्यात येत आहे. नियमित परतफेड व डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नवीन संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विहित कालावधीत कर्जाची परतफेड करणार्‍या संबंधितास ७ टक्के व्याज अनुदान तीन महिन्यांच्या अंतराने मिळणार असून शहरातील कॅप्टन अनिल पवार चौकात असलेले शुभम ग्राफिक्स व सुभाषरोड परिसरात असलेले वर्धमान रबर स्टॅम्प या सुविधा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने मागणी अर्ज भरता येणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनदयाल अंत्योदय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागात संपर्क करण्याचे आवाहन नगराध्यक्ष मोरे, उपनगराध्यक्षा सुनीता मोरकर, मुख्याधिकारी हेमलता डगळे, सभापती क्षमा मन्सुरी, सहायक प्रकल्प अधिकारी विजय भोई आदींनी केले आहे. यावेळी नगरपरिषदेचे नगरसेवक, बँकेचे शाखा प्रबंधक तसेच पथविक्रेता समितीचे सदस्य, अधिकारी, सेवक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या