Friday, April 26, 2024
Homeशब्दगंधआयुष्याची घडी बसवणारी थंडी

आयुष्याची घडी बसवणारी थंडी

राजेंद्र उगले

एखाद्या मंगलकार्याच्या पंगतीत जेवायला बसावे आणि वाढप्याने समोरच्याला त्याची आवड-निवड न विचारता सरळ घाईघाईने त्याच्या पात्रात वाढून पुढे सरकावे; तसा सरकत असतो निसर्ग आपल्या आयुष्यात. एक ऋतू संपला की दुसरा ऋतू येतो. तो संपला की तिसरा येतो. असे चालूच राहते सारखे निसर्गाचे चक्र. त्यातला आवडता कोणता, नावडता कोणता हे ठरवतो आपण सावकाश… काही अनुभवांवरून. सृष्टीला हिरवेगार करणारा पाऊस आवडतो काहींना, तर काहींना तप्त उन्हाळाही घालतो साद. थंडीचा ऋतू म्हणून आवडतो बर्‍याच जणांना हिवाळा. तो पोसतो शरीराला. जुनी जाणती मंडळी सांगत असते उगवत्या पिढीला या ऋतूत केलेल्या व्यायामाचे महत्त्व. थंडीच्या दिवसात घराघरांत तयार होतात खारीक-खोबर्‍याचे पोषक लाडू. काही ठिकाणी नुसत्याच मेथीचे लाडू करतात.

- Advertisement -

खाणार्‍यांचे तोंड कडू पण शरीर मात्र जाते भरत. थंडी आली की आपल्याला आठवतात अनेक आठवणी. थंडीतली शाळा आठवते, थंडीतली गार पाण्याची आंघोळ आठवते. थंडीत केलेली शेकोटी आणि त्याभोवती गोल धरून रंगलेला गप्पांचा फड. एवढ्या थंडीतही एखाद्याला बळीचा बकरा बनवून त्याला शेकोटीच्या सासूसाठी पळवणे. थंडीत कुडकुडत असल्याचा एखादा प्रसंग आठवतो आणि आपण हरवत जातो थंडीच्या उबदार रजईत. व्यक्तिपरत्वे बदलत जातात प्रत्येकाचे अनुभव.

त्यामुळेच तर सर्वांनाच नाही सांगता येत पटकन त्यांचा आवडता ऋतू. म्हणजे शालेय वयात यायचा निबंध पेपर सोडवताना – ‘माझा आवडता ऋतू.’ बोटावर मोजता येतील इतकी मुले लिहायची खरोखर त्यांना आवडणारा ऋतू, पण बर्‍याच जणांनी लिहिलेले असायचे गाईडबाबाच्या उपदेशातून प्रकटलेले अगाध ज्ञान. भौगोलिक परिस्थिती कोणतीही असो, आर्थिक परिस्थिती कशीही असो पण पेपरात आवडता ऋतू मात्र असायचा सारखाच. काहींना तर गाईडचाही झालेला नसायचा सत्संग! मग ही भक्तमंडळी वर्गातल्याच कुणा हुशाराला गुरुस्थानी ठेवून; त्या दिवसापुरते त्याचे शिष्यत्व पत्करून करून घ्यायचे उतारा. शिक्षकांना लक्षात यायचे ते पेपर तपासताना नि ते करायचे गुणांचे दान… त्यांच्या मनाप्रमाणे!

मीही लिहायचो हा निबंध. वर्गात वेगळाच ठरायचा कायम माझा निबंध. कारण तिथे लिहिलेले असायचे मी माझे स्वानुभव! आमच्या गावात गावभर पसरलेला असायचा फुफाटा. त्याचीच असायची आम्हाला दिवसभर संगत. नाकातून गळणारा शेंबूड हे आमच्या लहानपणी प्रत्येकाचे होते खास आभूषण! शर्टाच्या बाहीला नाहीतर डायरेक्ट मनगटाला तो पुसला जायचा. रुमाल नावाची वस्तू असते आणि ती नाक स्वच्छतेसाठी वापरायची असते… असा काही शोध तोपर्यंत नव्हता आमच्या कानावर. त्यामुळे या मनगटाशी हा फुफाटा दोस्ती करायचा.

अंघोळीच्या साबणांना तोपर्यंत झोपड्यांचा लागलेला नव्हता थांगपत्ता. त्यामुळे केवळ पाण्याने अंघोळ करणार्‍यांच्या हातावर मुक्कामी यायचा मळ. थंडीच्या कडाक्यात उलायचे हायपाय. व्हॅसलीन वगैरे पदार्थ तर उच्चारण्यासाठीही नव्हते उपलब्ध. त्यामुळे अंगावरचा हा मळ काढण्यासाठी सुटीच्या दिवशी प्रत्येकाची आई उतरायची मैदानात… हातात खडबडीत दगड घेऊन. गल्लीत मांडलेल्या मोठ्या दगडावर सुरू व्हायची राजेशाही अंघोळ. राजाची पाठ, हातपाय व्हायचे हुळहुळे नि लाल. डोळ्यातून सुरू असायच्या गंगा-यमुना. मध्येच पडायचा पाठीत एखादा धपाटा. दोन-चार दिवसांनी पुन्हा साचू लागायचा मळ.

शनिवारच्या शाळेची तर वाटत राहायची भीती. हा शनिवार काढूनच टाकायला हवा आठवड्यातून असेही असायचे मनसुबे, पण त्याचा शासन निर्णय काढण्याचे नव्हते कोणाकडेच अधिकार. शनिवारी कवायतीचे शिक्षक का येत असतील बरे शाळेत? ते खरेतर दर शनिवारी आजारी पडायला हवेत, असेच वाटायचे त्यावेळी. कारण बोटं फोडून रक्त बाहेर येईल की काय असे वाटत असणार्‍या थंडीत. खेळाचे हे शिक्षक मुलांना शाळेत येण्यास पाच मिनिटे उशीर झाला म्हणून सपासप घालायचे हातावर छडीचे वार.

कधी पोटर्‍याही धीराने करायच्या या युद्धाचा सामना. त्यांना आला छडीचा कंटाळा तर मारायला लावायचे शाळेच्या मैदानात पळून चक्कर. कधी कदमतालही सामील व्हायचा यात भर म्हणून. थंडीच्या धाकाने त्वचेच्या आत लपून बसलेले रक्त पळू लागायचे शरीरभर नि वाटायचे गरमागरम. श्वासांच्या वाढत्या आंदोलनांबरोबर मनाच्या कोपर्‍यात धगधगत राहायचे रागाचे चुल्हांगण. या जाळावर काहींच्या शिक्षणाची धार झाली बोथट तर काहींची अधिक अणकुचीदार. कालांतराने शिक्षण संपले नि शाळाही संपली. आज वाटते… त्याकाळी शिक्षकांनी दिलेली शिक्षा आणि त्यांचा असणारा धाक बसवून गेला आयुष्याची घडी.

आज मीही झालो शिक्षक. मला आठवू लागतो माझा नावडता शनिवार. आज मीच आहे माझ्या शाळेत कवायत घेणारा शिक्षक. शिक्षा तर आता झालीच आहे कालबाह्य. पण तरीही मुलांना वाटावी व्यायामाची गोडी यासाठी मी स्वतःच करत असतो प्रात्यक्षिके. माझ्याबरोबर व्यायाम करताना त्यांनाही वाटतो आनंद आणि थंडी जाते हळूहळू जळून… उगवत्या सूर्याच्या साक्षीने.

- Advertisment -

ताज्या बातम्या