Saturday, April 27, 2024
Homeनगरबिबट्या की तरस ?

बिबट्या की तरस ?

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी अहोरात्र बिबट्याचा शोध घेत आहेत. कोणाच्या डोळ्यांना झोप नाही अन् बिबट्या सापडतही नाही.

- Advertisement -

तालुक्यात झोप तर सर्वांचीच उडाली मग बिबट्या गेला कुठे, असा प्रश्न वनविभागासह ग्र्रामस्थांना पडला आहे. बिबट्या नरभक्षक बनल्याचे लोकांचे म्हणणे आहे, तर अन्य प्राणी खाणारा बिबट्या नसून तरस असावा, असे वन विभागाच्या कर्मचार्‍यांचा तर्क आहे.

बिबट्या सोडून तरस अचानक सक्रिय झाल्याने लोकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, वन विभागाने डोंगराळ भागातील गावात राहणार्‍या ग्रामस्थांना बिबट्याला पिटाळण्यासाठी फटाक्यांचे वाटप केले आहे.

पंधरा दिवसांपासून तालुक्यातील मढी, केळवंडी, करडवाडी येथे तीन बालकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण आहे. त्यात थंडीमध्ये अचानक वाढ झाल्याने सर्च ऑपरेशनमध्ये सुद्धा विस्कळीतपणा आला आहे. वनविभागाने राज्याच्या विविध भागातून सुमारे शंभर अधिकारी, तज्ज्ञ कर्मचारी, वाहनांचा ताफा, शस्त्रे साधनसामग्री, गुंगी आणणारी औषधे असा सर्व फौजफाटा शोध मोहिमेसाठी तैनात करून जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी सध्या तालुक्यात तळ ठोकून आहेत.

ऑपरेशन बिबट्या मोहिमेतील विस्कळीतपणा अजूनही न संपल्याने बिबट्या तीन दिवसात हाती लागला नाही. जिल्हा प्रशासनाकडूनही ताजी माहिती वारंवार विचारण्यात येत आहे.तर वनविभागाच्या शोधमोहिमेवर अधिकारी लक्ष ठेवून आहेत.औरंगाबाद व पुणे येथील पथके रविवारी तपास कार्यात सहभागी होऊन विविध ठिकाणी लावण्यात येणार्‍या पिंजर्‍याची संख्या वाढवण्यात आली आहे. बीड व नगर जिल्हा वनविभागाच्या वतीने गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये विशेषता करंजी ते मोहटादेवी अशा पट्टयात संयुक्तपणे मोहीम राबवली जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील वनमित्र व तालुक्यातील सर्पमित्र संघटनांच्या सदस्यांचा शोध मोहिमेत सक्रिय सहभाग वाढला आहे.गावाबाहेर निर्जन व दुर्गम भागातील वस्तीवर राहणार्‍या काही गावातील रहिवाशांना वनविभागाने संकटकाळी वाजवण्यासाठी फटाके दिले आहेत. ग्रामस्थ व प्रशासनाला चकवा देण्याएवढा बिबट्या चतुर झाला की शोध पथके योग्य दिशेने शोध घेत नाहीत याबाबत लोकांमध्ये संभ्रम वाढत आहे.

सायंकाळनंतर प्रत्येक गावातच नव्हे तर शहरातही विविध उपनगरांमध्ये बिबट्याच्या दहशतीने आपोआप लॉकडाऊन होते. बाजारपेठेवर बिबट्याप्रकरणाचा परिणाम जाणवू लागला आहे. सायंकाळनंतर शक्यतो कोणी घराबाहेर पडत नाही रविवारी रांजणी, मढी, माणिकदौंडी घाट परिसरात ट्रेसिंग कॅमेरे बसविण्यात येऊन माणिकदौंडी घाट ते मढीघाट असा दहा किलोमीटर डोंगर परिसरावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

तीन ते चार दिवसांच्या अंतराने बिबट्या हल्ला करतो असे अनुभव पाहता डोंगराळ भागातील विविध गावांमध्ये लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. काल सायंकाळपर्यंत काहीही हाती लागले नसल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

शोधमोहीम योग्य पद्धतीने सुरू नसून महामार्गाने वाहने पळवून बिबट्या कसा हाती लागेल. वन कर्मचार्‍यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी असून तातडीने बिबट्याला जेरबंद करून नागरिकांच्या मनातील भिती घालविणे आवश्यक आहे.

– भाऊसाहेब शिरसाठ, शिरसाटवाडी.

पिंजर्‍यात भक्ष ठेवण्यासाठी पैसे नाहीत.

शोध मोहिमेसाठी वनविभागाकडे निधीची कमतरता जाणवत आहे. गावपातळीवर पिंजर्‍यात ठेवण्यासाठी भक्ष विकत घेण्यासाठी सुद्धा पैसे नसल्याने लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी काही अधिकारी व कर्मचारी बिबट्या सारख्या प्राण्यांची लक्षणे असूनही तरसाने हल्ला केल्याची शक्यता व्यक्त करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या