Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारचिनोदा परिसरात बिबट्यांची दहशत

चिनोदा परिसरात बिबट्यांची दहशत

चिनोदा – Chinoda – वार्ताहर :

येथील सप्तशृंगी माता मंदिर परिसरातील शेत शिवारात बिबट्याचा मुक्तसंचार सतत सुरू असून शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिनोदा शिवारात

- Advertisement -

दोन मोठे व एक लहान बिबट्याचे दर्शन झाल्याने पहाटे व सायंकाळी व्यायाम करणारे तसेच शेतामध्ये राखणदार करणार्‍या कुटुंबामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, बिबट्यांच्या हालचाली टिपण्यासाठी वन विभागाकडून दोन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेर्‍यात बिबट्या कैद झाल्यास मग बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार आहे.

सध्या थंडीची चाहूल लागल्याने पहाटे व सायंकाळी व्यायाम करण्यांची संख्या वाढली आहे. तसेच शेतकरीवर्ग शेतीच्या कामांना जोमाने लागलेला असून गहू पेरणी, केळी लागवड, ऊस लागवड, टरबूज लागवड आदींसह विविध शेती कामांना वेग देण्यात आला आहे. मात्र, परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार दिसून येत आहे.

त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दि.23 रोजी सायंकाळी सप्तश्रृगी मंदिर परिसरातील शेतातील शेतात राखण करणार्‍या कुटुंबाला अचानक तीन बिबटे समोरच दिसले. घाबरलेल्या रखवालदार कुटुंब ताबडतोब बाजूलाच असलेल्या झाडावर चढले व जोरजोरात आरोळ्या मारु लागले.

रस्त्यावरुन जाणार्‍यांनी त्वरित वन विभाग व पोलिस स्टेशनला बिबट्याची माहिती दिली. बिबट्याची माहिती कळताच वन विभागाचे वनक्षेत्रपाल निलेश रोडे, वनपाल नंदू पाटील, वनपाल एस.सी.पाटील, वनरक्षक विरसिंग पावरा व पोलिस निरीक्षक नंदराज पाटील यांनी त्वरित जाऊन शेतातील राखणदार कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढले.

या घटनेमुळे चिनोदा परिसरातील शेतकरी, रखवालदार व शेतमजूर यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिनोदा परिसरात असलेल्या मेंढीच्या कळपातील काही दिवसांपूर्वी एक मेंढी सुध्दा फस्त केली असून त्यामुळे शेतकरी व शेतमजूर यांच्यामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी चिनोदा येथील शेतकर्‍यांनी केली आहे.

दरम्यान, बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी या भागात दोन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेर्‍यात बिबट्याच्या हालचाली कैद झाल्यास तेथे बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येईल. बिबट्याला लवकरच पकडण्यात येईल अशी माहिती तळोदा वन विभागाचे वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांनी सांगितले. यावेळी वनपाल एस.सी.पाटील, वनरक्षक चुनिलाल पाडवी, वनरक्षक लक्ष्मी पावरा, वनरक्षक ज्योती खोपे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या