Thursday, April 25, 2024
Homeनगरबिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात तीन वासरे ठार

बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात तीन वासरे ठार

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात तीन वासरे ठार केल्याची घटना मंगळवारी (दि. 22) रात्री घडली.

- Advertisement -

या घटनेमुळे जामखेड तालुक्यासह खर्डा, जातेगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी नामदेव गायकवाड याचे एक वासरू व महारुद्र निवृत्ती गायकवाड यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन वासरांवर बिबट्याने प्राणघातक हल्ला करत ठार केले आहे.

वनविभागाच्या अधिकार्‍याना माजी सरपंच पोपटराव गायकवाड यांनी घटनेची माहिती देताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली. काही ठश्यांचे नमुने ताब्यात घेतले. पावसामुळे ठश्यांची नीट ओळख पटली नाही. प्राथमिक अंदाजानुसार वासरावर हल्ला करणारे बिबटेच असू शकतात असे वनपाल अनिल खराडे म्हणाले.

जामखेड तालुक्यातील नायगाव, बांधखडक शिवारात गेल्या 20 ते 25 दिवसापूर्वी आढळून आलेल्या बिबट्याला पकडण्यास अजूनही वनविभागाला यश आले नसून आसपासच्या या भागात बिबट्याची दहशत कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या वेळी कोणी बाहेर पडण्यास घाबरत आहे.

जामखेड तालुक्यात बिबट्याचे दर्शन झाले असतानाही जामखेडमधील वनविभागाचे कार्यालय कर्जत येथे हलविल्याने कर्जतमधून जामखेड तालुक्यात वनविभागाचा करभार चालत असल्याने कार्यालय पुन्हा जामखेडला सुरु करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

गेल्या 20 ते 25 दिवसापूर्वी जामखेड तालुक्यातील नायगाव परिसरात बिबट्याने तीन वासरे, तीन शेळ्या व दोन म्हशीचे रेडकू हल्ल्यात जखमी केले आहेत. यापैकी दोन शेळ्या व एक वासराचा मृत्यू झाला आहे. नायगाव जवळच्या परीसरात (बांधखडक) गाव असून बिबट्याने वानरावर हल्ला करून ठार केले आहे.

त्यामुळे शेतकर्‍यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या पाऊलखुणावरुन या भागात बिबट्याचा वावर आहे. हे सिद्घ झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतात एकच पिंजरा लावूनही अद्यापपर्यंत बिबट्या जेरबंद झाला नाही मात्र दि. 19 रोजी रात्री 9.45 च्या दरम्यान नायगावचे सरपंच शिवाजी ससाणे यांनी गावाकडे येताना रस्त्याच्याकडेने शेतात जाताना बिबट्याला पाहीले होते.

याबाबत त्यांनी गावकर्‍यांना कल्पना दिली. या भागात पिंजरे वाढवून बिबट्याला जेरबंद करावे, अन्यथा एखादी मोठी जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार रोहीत पवार यांनी नायगाव येथे भेट देऊन या परिसरात पिंजरे वाढवण्याचे सांगितले. मात्र पुढे वनविभागाकडून कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत त्यामुळे नागरीकामध्ये भितीचे वातावरण आहे.

तसेच शेतकर्‍यांच्या ज्वारी, गहू, मका, ऊस पिकांचे रानडुक्करांनी नुकसान केले तर त्यांचा अर्ज देण्यासाठी कर्जतला जावे लागत आहे. त्यानंतर विभागाकडून पंचनामे केले जातात ते ही त्यांच्या सवडीनुसार त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. त्यातच या डोंगरी भागात तरस, लांडगे, रानडुक्करे आदी प्राणी माणसावर हल्ले करतात.

आता बिबट्या दिसल्याने नायगावसह नाहुली, तेलंगशी, धामनगाव, देवदैठण, खर्डा डोंगरपठार भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यात प्रयत्न वनविभागाने केला असला तरी जिव मुठीत धरून वस्तीवर तहात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या