Thursday, April 25, 2024
Homeनाशिकतो पुढे पुढे आणि बिबट्या मागे मागे

तो पुढे पुढे आणि बिबट्या मागे मागे

सिन्नर । वार्ताहर Sinnar

तालुक्यातील जामगाव येथून शेतातील काम उरकून सायंकाळी घराकडे परतत असलेल्या तरुणासमोर अचानक बिबट्या येऊन उभा ठाकला. काही क्षणातच बिबट्याने त्याच्यावर झडप घातली, मात्र तरुणाने प्रतिकार करत बिबट्याला ढकलून दिले. काहीकाळ बिबट्याने माघार घेतली, मात्र तरुण जसा जसा रस्त्याने पुढे जाऊ लागला, तसा तसा बिबट्या त्याच्या मागे मागे चालू लागला. मात्र प्रसंगावधान राखत तरुणाला बिबट्याला पिटाळून लावण्यात यश आले आणि तो सुखरूप घरी पोहोचला. मात्र तोपर्यंत तो किरकोळ जखमी झाला होता.

- Advertisement -

अविनाश मधुकर बोडके (24) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. अविनाश हा जामगाव येथे कुटुंबियांसह वास्तव्यास असून आई-वडील व दोन भाऊ असा त्याचा परिवार आहे. अविनाशने नुकतेच पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून तो शेतीकामही करतो. बोडके यांची जामगाव शिवारात वडाचा मळा परिसरात शेती आहे. सायंकाळी अविनाश शेतातून घरी परतत होता. शेतापासून काही अंतर चालून येताच अचानक त्याच्यासमोर बिबट्या उभा ठाकला. अविनाश घाबरून न जाता जागेवरच उभा राहिला. बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. अविनाशने हाताच्या कोपराने बिबट्याला ढकलून दिले. मात्र यात अविनाशच्या डोक्याला, गालाला बिबट्याचे दात लागले, तर पोटावर पंजा ओरखडला गेला. अविनाशच्या प्रतिकारामुळे बिबट्या माघारी फिरला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मात्र अविनाश हळूहळू घराकडे जात असताना बिबट्या हळूहळू त्याचा माग घेत होता. मधून मधून अविनाश हिंमत करत बिबट्याला हुसकण्याचाही प्रयत्न करत होता. काही अंतर गेल्यानंतर बिबट्यानेच माघार घेत तेथून धूम ठोकली. त्यानंतर अविनाश जखमी अवस्थेत घरी आल्यानंतर त्याने कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. नातेवाईकांनी अविनाशला तत्काळ दवाखान्यात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती वनविभागाला कळवल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मागदर्शनाखाली वन कर्मचार्‍यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन अविनाशची चौकशी केली व बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या