चांद्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच; आणखी एका शेळीचा फडशा

jalgaon-digital
1 Min Read

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून सोमवारी पुन्हा एका शेळीचा फडशा पाडला असून त्यामुळे पशुपालकांत चांगलीच घबराट पसरली आहे. वन विभाग अद्यापही सुस्तच असून ग्रामस्थ मात्र धास्तावले आहेत.

रविवारी चांदा-मिरी रोडवरील गहिनीनाथ मंदिराजवळील ढवळे यांच्या वस्तीवर बिबट्याने सात शेळ्यांवर हल्ला केला होता. त्यापैकी चार जागेवरच दगावल्या होत्या तर जखमी झालेल्या तीन शेळ्यांपैकी दोन शेळ्या दगावल्याने या हल्ल्यातील मृत शेळ्यांची संख्या 6 झाली. यातून सावरत नाही तोच सोमवारी मध्यरात्री पुन्हा बिबट्याने याच परीसरातील गट नं 316/2 मधील किशोर दत्तात्रय दहातोंडे यांच्या वस्तीवर एका शेळीचा फडशा पाडला. शेळ्यांच्या आवाजाने किशोर दहातोंडे यांच्यासह कुटुंबीय जागे झाले.

दारात बिबट्या पाहून सर्वच भयभयीत झाले. आरडाओरड करून फटाक्यांच्या आवाजाने बिबट्याने तेथून पलायन केले. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. वनविभागाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थ संतापले आहेत. परिसरात पिंजरा लावण्याची वारंवार मागणी करूनही वन विभाग मात्र कागद रंगवण्यातच मग्न असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. नुकसानग्रस्त पशुपालकांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी.

बिबट्याचा वावर असलेल्या भागात तातडीने पिंजरे लावावेत. चांदा परिसरासाठी पूर्णवेळ वनकर्मचार्‍याची नेमणूक करावी, अशी मागणी माजी सभापती कारभारी जावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल अडसुरे, तंटामुक्ती अध्यक्ष मोहन भगत, मुळाचे संचालक बाबुराव चौधरी यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *