Friday, May 10, 2024
Homeनगरवनविभागाच्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद

वनविभागाच्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारातील वरचा धनगरवाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात जेरबंद झाला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावांतर्गतच्या वरचा धनगरवाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली होती. बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असल्याने शेतकर्‍यांना शेती कामे करणे व शेताला पाणी देणे मुश्किल झाले होते. त्यामुळे स्थानिक रहिवासी बाळासाहेब कांदळकर, देवका कांदळकर, कचरू कांदळकर, दिनकर कांदळकर, राजेंद्र कांदळकर व भाऊसाहेब शिंदे यांनी पंचायत समितीचे माजी उपसभापती नामदेव दिघे यांना याबाबत माहिती दिली होती.

त्यानंतर माजी उपसभापती नामदेव दिघे यांनी वनविभागाकडे वरचा धनगरवाडा या ठिकाणी बिबट्यास पकडण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी तातडीने वरचा धनगरवाडा याठिकाणी बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. शनिवार व रविवार दरम्यानच्या रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेला नर जातीचा बिबट्या पिंजर्‍यात अलगद अडकला.

याबाबत स्थानिक रहिवाशांनी वनविभागाला माहिती दिली त्यानंतर वनपाल प्रशांत पुंड सहित वन कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बिबट्यास निंबाळे रोपवाटिकेत हलविले. यावेळी रहिवाशांनी बिबट्यास बघण्यासाठी गर्दी केली होती. परिसरात उच्छाद मांडणारा बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात जेरबंद झाल्याने रहिवाशांनी व शेतकर्‍यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

- Advertisment -

ताज्या बातम्या