Sunday, April 28, 2024
Homeधुळेएलईडी पथदिव्यांमुळे धुळे शहर उजळणार

एलईडी पथदिव्यांमुळे धुळे शहर उजळणार

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

महापालिकेतर्फे शहरात एलईडी पथदिवे लावण्यात येणार आहे. त्यामुळे शहर उजळणार आहे. 15 हजार 722 खांब्यांवर हे दिवे लावण्यात येणार आहे. दिवे लावण्याचा शुभारंभ आज झाला.

- Advertisement -

एलईडी पथदिवे लावल्यामुळे विद्युत बिल बचतीबरोबरच शहराच्या सौंदर्यांत वाढ होणार आहे. शहरात नवीन एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाचा शुभारंभ आज खा.डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते महात्मा गांधी चौक येथे करण्यात आला. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजिज शेख, भाजपा महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल उपस्थितीत होते.

मनपा क्षेत्रामध्ये सद्यःस्थितीतील जुने पथदिवे बदलवून नवीन एलईडी पथदिवे बसविण्याचा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर करण्यात आलेला होता. त्यानुसार शहरातील हद्दवाढ क्षेत्रासह एकुण सद्यःस्थितीत असणार्‍या 15 हजार 722 विद्युत खांबावर असणारे जुने पथदिवे तसेच कंट्रोल पॅनल बदलवून त्याठिकाणी काम्टन कंपनीचे पथदिवे बसविण्यात येणार आहेत.

रस्त्याच्या रुंदीनुसार व आवश्यकतेनुसार त्या-त्या क्षमतेचे एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहे. त्यासाठी हद्दवाढ क्षेत्रासह संपूर्ण शहराचा तांत्रिक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. तसेच नवीन बसविण्यात आलेल्या पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती पाच वर्षासाठी संबंधित ठेकेदारास देण्यात आलेली आहे.

या प्रस्तावामुळे शहर प्रकाशमान होण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. त्याच बरोबर महापालिकेला दरमहा येणारे विद्युत बिलात 40 टक्के बचत होणार आहे. देखभाल दुरुस्तीसाठी होणारा खर्चही त्यामुळे कमी होणार आहे. सदर एलईडी पथदिवे वल्लभ इलेक्ट्रीकल्स बडोदा या नामांकित कंपनी मार्फत उच्च दर्जा असलेले व रिप्लेस्मेंट हमी असलेले पथदिवे उत्पादक कंपनीकडून बसविण्यात येणार आहे.

प्रथम टप्प्यात शहरातील प्रमुख रस्त्यावरील विद्युत खांब्यांवर नवीन एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहेत. यात महात्मा गांधी पुतळा ते गुरुव्दारापर्यत, पंचवटी ते नगांवबारी पर्यत (देवपूर आग्रारोड), गुरुशिष्य स्मारक ते मोतीनाला पर्यंत, जुनी मनपा ते कृषी महाविद्यालय (पारोळारोड), छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चाळीसगावरोड चौफुली (चाळीसगावरोड), शिवतीर्थ ते फाशीपुल ते बारापत्थर व बस स्टॅन्ड रोड, फाशीपुल ते क्रांती चौक, दुध डेअरीरोड ते चितोडरोड, वरखेडी रोड, ग.नं. 1,5,6,7 व जेबी रोड या प्रमुख रस्ते च चौकांचा समावेश आहे.

कार्यक्रमाला उपमहापौर सौ. कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती संजय जाधव, महिला बालकल्याण सभापती सौ.वंदना थोरात, सभागृह नेते राजेश पवार, विरोधी पक्ष नेते साबीर शेठ, नगरसेवक सौ. वंदना भामरे, सौ.प्रतिभा चौधरी, हिरामण गवळी, देवा सोनार, रंगनाथ भिल, भगवान गवळी, नरेश चौधरी, युवराज पाटील, दगडू बागुल, प्रशांत बागुल,भगवान देवरे, ओमप्रकाश खंडेलवाल, चंद्रकांत महाजन, विद्युत अभियंता एन.के. बागुल, विविध विभागाचे प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या