Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारकार्यकर्त्यांनो समस्या सोडविण्यासाठी तळागळात पोहचा !

कार्यकर्त्यांनो समस्या सोडविण्यासाठी तळागळात पोहचा !

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

जिल्ह्यात दोन वर्षात १५३९ बालमृत्यू व ३८ मातामृत्यू झाले आहेत. देश अमृत महोत्सवी वर्ष तर नंदुरबार जिल्हा निर्मितीच्या रौप्य महोत्सवी वर्षातही समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. त्यामुळे समस्या सोडविण्यासाठी शासनाची वाट न पाहता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तळागाळातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते ना.अजित पवार यांनी केले.

- Advertisement -

नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज शहरातील व्ही.जी.राजपूत लॉन्समध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ना.पवार बोलत होते.

ना.पवार पुढे म्हणाले, एकेकाळी जिल्ह्यात राष्ट्रवादीची मजबूत पकड होती. मात्रराजकीय उलथापालथ होत असते. आता पुन्हा राष्ट्रवादीची फळी मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावागावात बुथ कमिट्या तयार कराव्यात.

सरकारी योजना दुर्गम भागात पोहचत नाहीत त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावागावात पोहचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मध्यंतरी झालेल्या निवडणूकांमध्ये काही जागा निवडून आल्या असल्या तरी त्यावर समाधान न मानता आणखी काम करावे.

सन १९९८ मध्ये सत्ता असतांना जिल्हा निर्मिती केली. वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले. जिल्ह्यात विकासाचे विविध योजना याव्यात यासाठी आदिवासी विकास खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यातून केवळ जिल्ह्याची आर्थिक उन्नती व्हावी ही प्रामाणिक भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, जिल्ह्यात स्थलांतर, बेरोजगारी, कुपोषण अशा अनेक समस्या आहेतच. आघाडीचे सरकार असतांना उपसा सिंचन योजनांना गती देण्यात आली. मात्र त्यानंतरच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता पुन्हा राज्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त आमदार निवडून दिले तर सत्ता येईल व तापी-बुराई सिंचन योजना मार्गी लावता येतील, असेही ना.पवार म्हणाले.

जलजीवन मिशन योजना ही ठेकेदारांच्या सोयीसाठी चालविली जात असून त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही ना.पवार यांनी केला. जिल्ह्यात दोन वर्षात १ हजार ५३९ बालमृत्यू व ३८ मातामृत्यू झाले आहेत.

देश अमृत महोत्सवी वर्ष तर नंदुरबार जिल्हा निर्मितीची रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत असतांनाही समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.

देशात राष्ट्रीय नेत्यांना धमकी दिली जाते तर सर्वसामान्यांचे काय? देशात व राज्यात नेमके काय सुरु आहे? असा सवाल उपस्थित करत कायदा आणि सुव्यवस्थेवर त्यांनी ताशेरे ओढले. जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थिती असतांना पक्ष संघटनासाठी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे करीत असलेल्या कामाचे त्यांनी कौतूक केले.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशउपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी नंदुरबार, शहादा, तळोदा या विधानसभा मतदार संघाच्या जागा राष्ट्रवादीसाठी देण्यात याव्या, अशी मागणी केली. जिल्हयात रस्ते कामात मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात भ्रष्टाचार झाला असून त्याबाबत लक्षवेधी उपस्थित करुन संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी मागणी केली.

प्रास्ताविक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी केले. डॉ.मोरे म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत पक्ष संघटन मजबूत केले असून कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचा प्रयत्न केला आहे. कमी दिवसात राष्ट्रवादीची पुन्हा भक्कम स्थिती निर्माण झाल्याने येत्या विधानसभा निवडणूकीत दोन जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केले.

जि.प.सदस्य मोहन शेवाळे यांनी जिल्ह्यातील कुपोषण, स्थलांतर, बेरोजगारी असे विविध प्रश्न मांडत शहादा-तळोदा मतदार संघातून राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी देण्याची मागणी केली. याप्रसंगी नंदुरबार पालिकेचे माजी प्रतोद मोहन माळी तसेच सीमा सोनगीरे,

तुषार सनंसे, सिताराम पावरा, दानिश पठाण, डॉ.जितेंद्र भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा निरीक्षक नाना महाले, मधुकर पाटील, हितेंद्र क्षत्रिय, संदिप परदेशी, सुरेंद्र कुवर, डॉ.नितीन पवार, ऍड.अश्विनी जोशी, अल्का जोंधळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या