Thursday, April 25, 2024
HomeUncategorized...तर आघाडी सरकार धोक्यात

…तर आघाडी सरकार धोक्यात

मुंबई l Mumbai (प्रतिनिधी)

औरंगाबाद शहराच्या नामांतराचा हट्ट धरला तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात येऊ शकते, असा इशारा काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी शनिवारी शिवसेनेला दिला. आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अमलबजावणीसाठी आहे, नामांतरासाठी नाही, असेही निरुपम म्हणाले.

- Advertisement -

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादच्या नामांतराचा वाद पेटला आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या मागणीने पुन्हा उचल खाल्ली आहे. विरोधी पक्ष भाजपने शिवसेनेची कोंडी करण्यासाठी नामांतराचा मुद्दा लावून धरला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतर प्रकरणी पक्षाची भूमिका स्पष्ट केल्यानंतरही निरुपम यांनी आज ट्विट करत नामांतराच्या वादात उडी घेतली.

औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. परंतु, राज्यातील सरकार हे तीन पक्षाचे आहे. आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमासाठी आहे, कुणाचा वैयक्तिक अजेंडा राबविण्यासाठी नाही, असे निरुपम यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजी महाराज हे महान योद्धा होते. काँग्रेससाठी संभाजी महाराज हे वंदनीय आहेत,असेही निरुपम यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, भाजपने औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेवर दुटप्पी राजकारणाचा आरोप लगावला आहे. नामांतराच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेनेची हातमिळवणी आहे. हे दोन्ही पक्ष जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत,असा आरोप भाजपचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी केला आहे.

त्यावेळी नामांतर का केले नाही ?

अलाहाबादचे प्रयागराज आणि फैजाबादचे अयोध्या असे नामांतर करताना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करावे असे तेव्हा भाजपला का वाटले नाही? असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या