Tuesday, April 23, 2024
Homeब्लॉगहास्य : एक वैज्ञानिक दृष्टिकोन

हास्य : एक वैज्ञानिक दृष्टिकोन

माणसा-माणसांमधले भावबंध घट्ट होण्यासाठी हसण्याचा उपयोग होतो. म्हणून डॉ. प्रॉविन हसण्याला ‘सामाजिक संदेश’ असे म्हणतात. राग, दु:ख़, भीती अशा नकारात्मक भावना मनात दडवून ठेवण्याकडे सर्वसाधारण माणसाचा कल असतो. अशावेळी या भावनांचा निचरा होण्यासाठी हसण्याचा फार उपयोग होतो. खूप हसल्यावर खरोखरच तणावमुक्त आणि आनंदी झाल्यासारखे वाटते. हसण्याचे हे मानसिक परिणाम लक्षात घेऊन आता कित्येक हॉस्पिटल्मध्ये ‘लाफ्टर थेरपी’ची सुरुवात झाली आहे. हासण्याबाबत जगभरात बरेच संशोधन झाले आहे. जागतिक हास्यदिनानिमित्त त्याचा मागोवा…

रीडर्स डायजेस्ट’ या जगप्रसिद्ध मासिकात ‘लाफ्टर द बेस्ट मेडिसीन’ या नावाचे एक सदर नेहमी असते. त्यामध्ये वेगवेगळे विनोद लिहिलेले असत आणि ते वाचून खरेच हसू फुटते. ‘हसणे’ या विषयावर आता खूप संशोधन होत आहे आणि हसण्याचे शरीरावर कोणते चांगले परिणाम होतात यावर शास्त्रीय निष्कर्षही काढले गेले आहेत. त्यामुळे हसणे हा विषय हसण्यावारी न नेता गंभीरपणे त्यावर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. हसण्याचा अभ्यास ज्या विद्याशाखेत केला जातो तिला ‘जेलोटॉलॉजी’ असे नाव आहे.

हसण्यावर मूलभूत संशोधन करणारे वैज्ञानिक डॉ. रॉबर्ट प्रॉविन यांनी या संशोधनावर आधारित ‘लाफ्टर, एक सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन’ या नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. ‘हा हा हा’ आणि ‘हो हो हो’ या हसण्याच्या तरंगांचा अभ्यास करताना त्यांना आढळले की ते एकमेकांपासून भिन्न प्रकारचे आहेत. कोणाचेही हसणे हे या दोन पद्धतींपैकी एका पद्धतीचे असते. दोन्ही पद्धतीने ते मिश्रण असू शकत नाही. हसणे म्हणजे आपण स्वर उच्चारतो त्या पद्धतीचे दर 210 मिलीसेकंदांनी होणारे स्पंदन असते. ते आणखी असे सुचवतात की, प्रत्येक माणसाच्या मेंदूत एक शोधक किंवा अधिमापक (डिटेक्टर) असतो. दुसर्‍याचे हसणे ऐकले की हा शोधक प्रतिक्रिया म्हणून मेंदूमधील इतर मज्जातंतू परिपथ सुरू करतो आणि त्यामुळे हसणे सुरू होते आणि म्हणूनच आपण म्हणतो की हसणे हे संसर्गजन्य असते. एकजण हसू लागला की दुसर्‍यालाही हसू येऊ लागते. प्रॉविन यांचे असेही म्हणणे आहे की, हसू येणे काही प्रमाणात आनुवंशिक असते. काही लोकांना हसवणे सोपे तर काहींच्या बाबतीत ते कठीण असते.

- Advertisement -

हसण्याचे अनेक प्रकार आहेत. स्मितहास्य, बत्तीशी, खो खो हसणे आणि जोरजोराने आवाज करत खळखळाटी हसणे. जोरजोराने हसताना चेहर्‍याचे 15 स्नायू आकुंचन पावतात. वरचा ओठ उचलून धरू शकणारा चेहर्‍यावरचा महत्त्वाचा स्नायू कार्यान्वित होतो, घशामधील स्वरयंत्रावरील झडप अर्धवट बंद होते, त्यामुळे श्वास घेण्यासाठी धडपड सुरू होते. अश्रूंच्या नळ्या कार्यान्वित होतात. चेहरा ओलसर आणि लाल होतो.

माणसा-माणसांमधले भावबंध घट्ट होण्यासाठी हसण्याचा उपयोग होतो. म्हणून डॉ. प्रॉविन हसण्याला ‘सामाजिक संदेश’ असे म्हणतात. एका निरीक्षणाद्वारे असे सिद्ध झालेय की, माणसे जेव्हा दुसर्‍या माणसांबरोबर असतात तेव्हा ती हसण्याची शक्यता ही ती एकटीच असताना हसण्याच्या शक्यतेच्या तीस पटीने जास्त असते. हसू फुटण्यासाठी मेंदूतील अनेक भाग जबाबदार असतात. विनोदावर संशोधन करणार्‍या पीटर डर्क्स या शास्त्रज्ञाने अनेक व्यक्तींच्या मेंदूचे इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफ्स (इइजी) त्या व्यक्ती हसत असताना काढले. त्यात त्याला आढळले की, माणसे हसू लागली की त्यांच्या मेंदूच्या सर्वात मोठ्या भागातून विद्युततरंग जात होता. हा विद्युतभार ऋण असताना हसू फुटत होते, पण घन असताना हसण्याची क्रिया होत नव्हती.

खळखळून हसत असताना महत्त्वाच्या अनेक गोष्टी घडत असतात. आपण जेव्हा चिडलेले, संतापलेले असतो, मनात द्वेष ठासून भरलेला असतो, परिस्थितीचा ताण मनावर असतो त्यावेळी आपल्या शरीरात कॉर्टिझॉलसारखे स्ट्रेस हार्मोन्स कार्य करत असतात. या हार्मोन्समुळे आपली रोगप्रतिकार शक्ती काम कमी करते. रक्तामधील प्लेटलेटस् वाढतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येतात आणि रक्तदाब वाढतो. आपण जेव्हा खळखळून हसतो तेव्हा व्हायरस आणि ट्यूमर्स यांना मारणार्‍या नैसर्गिक पेशींच्या संख्येत वाढ होते. गॅमा इंटरफेरॉन या रोगाला प्रतिकार करणार्‍या प्रथिनाची वाढ होते. रोगप्रतिकारक शक्तीमधील महत्त्वाच्या टी पेशींमध्ये तसेच रोगाला नामशेष करणार्‍या अ‍ॅन्टिबॉडीज तयार करणार्‍या बी पेशींमध्येही वाढ होते. या सगळ्याचा फायदा अनेक रोगांवर विजय मिळवण्यासाठी होऊ शकतो.

उदाहरणार्थ, कॉर्टिझॉलमुळे रक्तवाहिन्यांमधील एन्डोथेलियम या अस्तराला इजा पोहोचते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येतात आणि रक्तदाब वाढतो. खळखळून हसताना कॉर्टिझॉल कमी होते. त्यामुळे एन्डोथेलियमला इजा होण्याची शक्यता कमी होते. परिणामी रक्तवाहिन्यांमधले कोलेस्ट्रॉल जमा होत नाही आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहायला मदत होते. अ‍ॅन्टिबॉडीजचे प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्या कडक होण्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पॅरालिसीस होण्याची शक्यताही कमी होते.

जपानमध्ये डॉ. किको हायाशी यांनी मधुमेहाच्या रुग्णांवर हसण्याचे प्रयोग केले. त्यामध्ये त्यांना आढळले की जेवणानंतर जे रुग्ण खळखळून हसले त्यांच्या रक्तातल्या साखरेचे प्रमाण न हसलेल्यांपेक्षा कमी वाढलेले होते. खळखळून हसल्याने इन्फेन्शनला प्रतिकार करणार्‍या अ‍ॅन्टिबॉडीज तयार होतात. टी सेल्स, बी सेल्स, गॅमा इंटरफेरॉन यामध्ये वाढ झाल्याने इन्फेक्शन लवकर बरे होण्यास मदत होते. हास्यामुळे रक्तातील ऑक्सिजन वाढल्यानेही जखमा लवकर भरून येण्यास मदत होते.

वैज्ञानिकांच्या मते आपण शंभर वेळा खळखळून हसलो तर दहा मिनिटे होडी वल्हवण्याचा किंवा पंधरा मिनिटे व्यायामाच्या सायकलीवर बसून केलेला व्यायाम यामुळे शरीरातील स्नायूंना होणार्‍या फायद्याएवढाच फायदा होतो. हसण्यामुळे पोटातील स्नायू, पोट आणि छातीचा पिंजरा यामधील पडदा म्हणजेच डायफ्रँम, चेहर्‍याचे स्नायू, श्वासोच्छसामधले अंतर्भूत सर्व स्नायू, पाठ आणि पायाचे स्नायू या सर्वांना व्यायाम होतो आणि ते अधिक जोमाने काम करू लागतात. हसण्यामुळे संपूर्ण शरीराला इतका व्यायाम होतो म्हणूनच खूप वेळ जोरजाराने हसले की दमल्यासारख वाटू लागते. खळखळून हसणे हा एरोबिक व्यायामाचा प्रकार असल्यासारखाच आहे.

एका संशोधनाद्वारे निष्कर्ष काढला गेला आहे की, खळखळून हसण्यामुळे मेंदूमध्ये विशेष न्यूरोट्रान्समीटर्स म्हणजेच एन्डॉर्फिन्स तयार होतात. ज्यामुळे वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. याचे मोठे उदाहरण आहे नॉर्मन कझिन्स यांचे. त्यांना प्रत्यक्ष आलेल्या अनुभवावर आधारित त्यांनी ‘अ‍ॅनॉटॉमी ऑफ अ‍ॅन इलनेस’ या शीर्षकाचे पुस्तक लिहिले आहे. कझिन्स यांना पाठीच्या कण्याचा दुर्धर रोग झाला होता आणि तो बरा होण्याची शक्यता नाही. कदाचित त्यातच त्यांचा मृत्यू होऊ शकतो असे भाकित डॉक्टरांनी केले होते. हे समजल्यावर कझिन्स हॉस्पिटलमधून एका हॉटेलमधल्या खोलीत येऊन राहिले. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर होत असलेल्या स्टिरॉईडस्च्या मार्‍याने ते वैतागून गेले होते. हॉटेलमधल्या खोलीवर आल्यावर त्यांनी ‘क’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात घ्यायला सुरुवात केली आणि ते विनोदी चुटके, प्रसंग असलेल्या फिल्म्स बघू लागले. त्यांना असा अनुभव आला की भरपूर हसायला आल्यानंतर दोन तास त्यांना वेदनारहित शांत झोप लागायची. ही वेदनारहित झोप लागण्याचे कारण अर्थातच मेंदूमधील एन्डॉर्फिन हेच होते-जे हसण्यामुळे तयार होण्यास मदत होत होती. कझिन्स यांना त्यांच्या या पद्धतीने हळूहळू आराम पडू लागला. वेदना कमी झाल्या आणि शांत झोप लागू लागली. ज्या लहान मुलांवर शस्त्रक्रिया होणार असते अशांना त्याची खूप भीती वाटत असते. हे टाळण्यासाठी, शस्त्रक्रियेपूर्वी या मुलांची मानसिक स्थिती चांगली राहावी यासाठी मुलांच्या वॉर्डमध्ये जोकर वगैरे आणून त्यांना हसवण्याचा प्रयत्न केला जातो.

- Advertisment -

ताज्या बातम्या