वारकऱ्यांवरील लाठीमारावरून जयंत पाटील, राऊतांचा संताप; रोहित पवारांनीही सुनावलं

jalgaon-digital
4 Min Read

मुंबई | Mumbai

दरवर्षी आषाढी वारीनिमित्त (Ashadhi Wari) लाखो वारकरी पंढरपूरात दाखल होत असतात. यावर्षी देखील मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरसाठी निघाले आहेत. या दरम्यान आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर लाठीचार्ज (lathi charge) केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचा दाखल देऊन आता विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरत टीका करायला सुरुवात केली आहे.

धर्माभिमानी एकनाथ शिंदे कुठे आहेत?

ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या घटनेवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारला होता. देवेंद्र फडणवीसांना प्रश्न पडतो की महाराष्ट्रात औरंग्याची औलाद कशी काय निर्माण झाली. ती काल आम्ही पाहिली तुमच्या राजवटीत. याला जबाबदार पूर्णपणे भारतीय जनता पक्ष आहे. आळंदीच्या वारीचं नियोजन राजकीयदृष्ट्या आपल्या हातात असावं. देवळात कोणी जावं, किती लोकांनी जावं, कसं जावं याचं नियोजन भाजपाचे काही बोगस आचार्य, प्राचार्य, दृढाचार्य तिथे बसून करत होते. यातून वारकरी आणि त्यांच्यात वाद झाला. शेवटी, ती परंपरा संस्कृतीची वारकऱ्यांची आहे. राजकीय टग्यांची नाही. त्यातून पोलिसांना वारकऱ्यांवर लाठीमार करावा लागला. बेदमपणे वारकऱ्यांना मारताना चित्र दिसतंय, त्यामुळे लाठीमार झाला हे कोणी नाकारच शकत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

वारकऱ्यांवरचा हल्ला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवरचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा हल्ला आहे. पंढीरीची वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता आहे. अख्ख्या जगात वारीचा सन्मान केला जातो. नियोजन, संयम, शांतता शिस्त अशी वारी असते. अशाप्रकारचं संकट कधी आलं नव्हतं. या सरकारची लोकं विठूमाऊलीची महापूजा करायला जातील. त्यांना अधिकार नाही. त्यांनी आधी महाराष्ट्र आणि वारकऱ्यांची माफी मागितली पाहिजे”, असं संजय राऊत म्हणाले. आळंदीमध्ये वारकरी बांधवांवर हल्ला झाला. याबद्दल कोण प्रायश्चित्त घेणार. तुमचे ते धर्माभिमानी एकनाथ शिंदे कुठे आहेत? हिंदुत्त्वाचा आक्रोश करणारे देवेंद्र फडणवीस कुठे आहेत? हिंदू आक्रोश मोर्चा काढणारे लोकं कुठे आहेत? वारकऱ्यांवरचा हल्ला हिंदुत्त्वावरचा हल्ला नाही का? हिंमत असेल तर सरकारविरोधात हिंदुत्त्वाचा आक्रोश मोर्चा काढा. आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो. सरकारने महाराष्ट्राची आणि वारकऱ्यांची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे, असंही ते पुढे म्हणाले.

हिंदूत्ववादाचा डंका पिटणारे शिंदे फडणवीस सरकार ढोंगी

संजय राऊतांपाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा निषेध केला आहे. महाराष्ट्राला वारीची ३०० वर्षाची परंपरा आहे. या तीनशे वर्षांच्या परंपरेत प्रथमच वारीच्या पवित्र परंपरेला गालबोट लागून पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठी चार्ज केला आहे. तीनशे वर्षांमध्ये कधीही न झालेली गोष्ट शिंदे फडणवीस सरकारने करून दाखवली, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. हिंदूत्ववादाचा डंका पिटणारे शिंदे फडणवीस सरकार ढोंगी आहे, हेच यातून सिद्ध होते, अशी टीका देखील जयंत पाटील यांनी केली.

दिंडी सोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट

वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. पण यापूर्वी कधीही वारकऱ्यांवर बळाचा वापर केल्याची घटना घडली नव्हती. जे आजवर कधीही घडले नव्हते ते यावर्षी घडले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.तसेच माऊलींच्या दिंडी सोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट लागले आहे. दिंडीसोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर झालेला लाठी हल्ला अतिशय संतापजनक आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

केवळ राजकारणासाठी अध्यात्माचा वापर

आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाच्यावेळी वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. वारीच्या परंपरेत पहिल्यांदाच अशी दुर्दैवी घटना घडली. राजकीय फायद्यासाठी वापर करण्यात येणारे काही बोगस वारकरी या सोहळ्यात घुसल्याने खऱ्या वारकऱ्यांवर अन्याय झाला आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या वारकऱ्यांवर लाठीहल्ला करण्याचं पाप या सरकारने केले अशी टीकाही त्यांनी केली. तसेच, केवळ राजकारणासाठी अध्यात्माचा वापर करणाऱ्यांना अध्यात्माची खरी संस्कृती कशी कळणार? हाही प्रश्न आहेच, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *