करोना : भंडारदरा धरण परिसर व कळसूबाई शिखर पर्यटकांसाठी बंद

भंडारदरा ( वार्ताहर) – महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या राज्यातील सर्वात उंच कळसूबाई शिखर व भंडारदरा धरण परीसर 31 मार्च पर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा (शेंडी) व बारी, ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास पाच हजाराचा दंड ठोठावला जाणार आहे.

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वत शिखर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची 5400 फूट म्हणजे सुमारे 1646 मीटर आहे. ट्रेकिंगचा छंद असलेल्या हजारो पर्यटकांची इथे रेलचेल असते. मात्र,गेल्या आठ दिवसांपासून करोना विषाणूचा धुमाकूळ सुरू असून नगर येथे सुद्धा रुग्ण आढळला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बाहेरून येणार्‍या लोकांसाठी भंडारदरा (शेंडी)व कळसूबाई शिखर काही दिवस बंद राहणार आहे.