Friday, April 26, 2024
Homeनाशिकलासलगाव बाजार समिती ४ एप्रिलपर्यंत बंद

लासलगाव बाजार समिती ४ एप्रिलपर्यंत बंद

लासलगाव । Lsalagoan

करोनाचा वाढता प्रादुर्भाव, मार्चअखेरमुळे जमा-खर्च ताळेबंद आणि बँकांचे वर्षभराचे नियोजन यामुळे बँका बंद असून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये 4 एप्रिलपर्यंत शेतमाल लिलाव बंद ठेवण्यात आल्याने या पंधरवड्यात बाजार समित्या 8 ते 10 दिवस बंद राहणार आहेत. साहजिकच शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट कोलमडणार असून शेतमाल विक्रीला अडचणी आल्या आहेत.

- Advertisement -

संपूर्ण जिल्हाभरात करोनाचा संसर्ग वाढत असताना शासनाकडून प्रत्येक शहरात सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच बाजारपेठांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. करोना संसर्गामुळे बाजारपेठांमध्ये भीतीचे वातावरण असताना आता मार्चअखेरच्या नावाखाली व्यापार्‍यांनीही आपल्या आर्थिक वर्षाचा लेखाजोखा व्यवस्थित करण्यासाठी लिलावात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. साहजिकच जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये शेतमाल लिलाव प्रक्रिया बंद राहणार आहे.

मार्चअखेरमुळे बँका, सोसायट्या, पतसंस्था यांनाही ऑडिट करायचे असल्याने त्यांनीही आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. साहजिकच होळी, धूलिवंदन या महत्त्वाच्या सणांबरोबरच पुढील पिकांचे नियोजन करण्यासाठी शेतकर्‍यांना पैशांची गरज असते. मात्र सलग आठ दिवस बँका बंद राहणार असल्याने तसेच शेतमाल लिलावदेखील बंद राहणार असल्याने हातात आलेले पीक विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे पुढील पिके उभी करण्यासाठी शेतकर्‍यांचे नियोजन कोलमडले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी बाजार समिती परिसर बंद ठेवून पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे बाजार समितीच्या कामात व्यत्यय येत गेला. काम सुलभ होण्यासाठी मजूर टंचाईचे कारण देत खुले कांदा लिलाव गोणीत सुरू करण्यात आले. शेतकर्‍यांचा विरोध झाल्यावर पुन्हा ते खुल्या पद्धतीने सुरू झाले. आता पुन्हा ऐन काढणी हंगामात बाजार समित्यांचे कामकाज 4 एप्रिलपर्यंत बंद राहील. काही ठिकाणी बाजार समित्या दहा दिवसांपर्यंत बंद राहतील. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीला अडचणी येणार आहेत. सध्या कांदा काढणीचा हंगाम वेगात सुरू आहे.

अवकाळीमुळे कांद्याची टिकवण क्षमता घटली आहे. परिणामी शेतकरी कांदा विक्री करताना दिसून येत आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर कांदा कसा विकायचा? असा प्रश्न आहे. आठ-दहा दिवस लिलाव बंद राहणे शेतकर्‍यांसाठी अडचणीचे आहे. त्यामुळे फक्त दोन दिवस लिलाव प्रक्रिया बंद ठेवावी, अशी मागणी जिल्हाभरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.

जिल्ह्यातील बाजार समिती बंद नियोजन

सद्यस्थितीत संपूर्ण जिल्हाभरात उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पुढील पिके उभी करण्यासाठी शेतकरी कांदा विक्रीला प्राधान्य देत आहेत. मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मार्चअखेर यामुळे बँका, सोसायट्या, पतसंस्था बंद असताना आता बाजार समित्याही बंद राहणार आहेत.

जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लासलगाव 27 मार्च ते 4 एप्रिल, पिंपळगाव बसवंत 29 मार्च ते 4 एप्रिल, नामपूर 26 मार्च ते 4 एप्रिल, उमराणे 27 मार्च ते 4 एप्रिल, मनमाड 29 मार्च ते 4 एप्रिल, येवला 25 मार्च ते 4 एप्रिल, सिन्नर 27 मार्च ते 4 एप्रिल याप्रमाणे बाजार समितीत शेतमाल लिलाव प्रक्रिया बंद राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या