पोलीस निरीक्षकाच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीची परस्पर विक्री

jalgaon-digital
3 Min Read

कोथूळमधील जमीन बनावट कागदपत्र बनून विकली

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – पुणे येथील रहिवासी व सध्या ठाणे जिल्ह्यात नोकरीत असलेल्या पोलीस निरीक्षकाच्या पत्नीच्या नावावर असलेली कोथूळ (ता. श्रीगोंदा) येथील जमीन बनावट महिला उभी करून परस्पर विकण्याचा प्रकार घडल्याने याबाबत जमीन मालक मीना किशोर पासलकर यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मीना किशोर पासलकर यांची श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ या ठिकाणी जमीन होती. मात्र काही लोकांनी बनावट आधारकार्ड ओळखपत्र बनवून ती शेतजमीन परस्पर विकल्याचा प्रकार घडला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की वेल्हा जिल्हा पुणे येथील किशोर चंद्रकांत पासलकर हे ठाणे जिल्ह्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असून त्यांच्या पत्नी मीना पासलकर यांच्या नावे श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ या ठिकाणी गट न 326/5/2क्षेत्र एक हेक्टर 45 आर जमीन धोंडीराम काळू पवार राहणार कोथूळ तालुका श्रीगोंदा यांच्याकडून सन 2005 साली खरेदी केली होती. याचे दिनांक 5 जुलै 2018 रोजी बनावट आधारकार्ड तयार करून व बनावट महिला उभी करून राजाराम गोपीनाथ भोसले राहणार कोथूळ तालुका श्रीगोंदा गोरख तुकाराम लगड राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा यांनी श्रीगोंदा दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट दस्त तयार करून खरेदी केली.

याबाबत मीना किशोर पासलकर पुणे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जमीन खरेदी करणार राजराम भोसले व गोरख लगड व इतर जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करत आहेत. याबाबत आरोपी आशा गोरख लगड, राजाराम गोपीनाथ भोसले, गोरख तुकाराम लगड सर्व राहणार कोथूळ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल असला तरी यामागे असणारे सूत्रधार वेगळेच असून असे प्रकार तालुक्यात कायमच घडत आहेत.

दुय्यम निबंधक कार्यालयाची फसवणूक
बनावट आधारकार्ड बनवून ते पुरावे सादर करून खोटा दस्तावेज लिहून दिला. देणार व घेणार यांना ओळखणारे आपसात संगनमत करून खोटा दस्तावेज तयार करून फिर्यादीची व शासनाची फसवणूक केली आहे.

अन सातबारा झाला दुसर्‍याच्या नावाने
मीना किशोर पासलकर यांचे पती तालुका वेल्हा जिल्हा पुणे येथील रहिवासी असून त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे सन 2005 ला श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ या ठिकाणी सुमारे साडेतीन एकर जमीन घेतलीं. तिची 13 वर्षानी परस्पर विक्री झाली. यांचा थांगपत्ताही पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांना कसा लागला नाही. जेव्हा उतारे पाहिले तेव्हा मात्र आपली जमीन दुसर्‍याच्या नावावर झाली असल्याचे लक्षात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *