Friday, April 26, 2024
Homeनगर32 कोटींच्या जागा खरेदी निर्णयाला विरोध

32 कोटींच्या जागा खरेदी निर्णयाला विरोध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी उपनगर परिसरात स्मशानभूमी व दफनभूमीसाठी आरक्षित असलेली जागा सोडून त्या ऐवजी 32 कोटी रूपये खर्चून नवीन जागा संपादित करण्याच्या महासभेच्या निर्णयाला विरोध वाढला आहे. सभेच्या दिवशी शिवसेना उद्धव ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोध केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही याला विरोध दर्शवत या ठरावाची अंमलबजावणी न करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

सोमवारी बाळासाहेबांची शिवसेनाचे नगरसेवक संग्राम शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका परविन कुरेशी व समद खान यांनी आयुक्तांना निवेदन देऊन या विषयाला विरोध नोंदविला आहे. तसेच बाळासाहेबांची शिवसेनाचे दक्षिण जिल्हा प्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनीही मनपा आयुक्तांना पत्र देऊन सदर प्रस्तावाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी केली आहे.

स्मशानभूमी व दफनभूमीसाठी नवीन जागा खरेदीसाठी वापरण्यात येणारी रक्कम नगर शहरातील खड्डे बुजविण्याकरीता वापरण्यात यावी. उद्यान विकसित करण्यासाठी व चौक सुशोभिकरण करण्यासाठी वापरावी, असेही नगरसेवकांनी सुचवले आहे. नगररचना विभाग व काही पदाधिकार्‍यांनी अनेक वर्षापासून स्मशानभूमीचे आरक्षण असलेली जागा मूळ मालकाच्या ताब्यात देण्याचा घाट घातलेला आहे.

तसेच स्मशानभूमीसाठी चार एकर नवीन जागा अवाजवी किंमतीत घ्यावी, असे नगररचना विभागाने सुचविले आहे. त्यामुळे महापालिकेचा आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर विषय रद्द न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी नगररचना विभाग व महापौर यांची असून, शासन दरबारी किंवा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा टायरवाले यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या