Friday, April 26, 2024
Homeनगरजमीन वाटपात खंडकरी शेतकर्‍यांची शासनाकडून दिशाभूल- खंडागळे

जमीन वाटपात खंडकरी शेतकर्‍यांची शासनाकडून दिशाभूल- खंडागळे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

खंडकरी शेतकर्‍यांना जमिनीचे वाटप करताना वर्ग 1 धारणेच्या देवू, अशा मार्गदर्शक सूचना असताना प्रत्यक्षात सदर जमिनी वर्ग 2 धारणेच्या देण्यात आल्या. यामुळे शासनाने मार्गदर्शक तत्वाची पायमल्ली करुन खंडकरी शेतकर्‍यांची दिशाभूल केली असून सदरच्या वर्ग 2 धारणेच्या जमिनी वर्ग 1 धारणेच्या करुन द्याव्यात, अशी मागणी खंडकरी जमिन वाटप समितीचे सदस्य सुधाकर खंडागळे यांनी केली आहे.

- Advertisement -

यासंदर्भातील प्रसिध्दी दिलेल्या पत्रकात श्री. खंडागळे यांनी म्हटले आहे की, खंडकरी शेतकर्‍यांना जमिनी परत करताना शासनाने मार्गदर्शक तत्वे ठरविली होती. त्यानुसार सदर जमिनी पाटपाण्याच्या हक्कासह वर्ग 1 धारणेच्या मालकी हक्काने देण्याचे ठरले होते. मात्र सन 1978 आणि सन 2012-14 मध्ये खंडकरी शेतकर्‍यांना वर्ग 2 धारणेनुसार जमिनी देण्यात आल्या. वास्तविक शासनाने शेती महामंडाळासाठी खंडाने जमिनी घेताना वर्ग 1 धारणेच्या घेतल्या. तथापि, परत करताना मात्र वर्ग 2 धारणेच्या करुन दिल्या. ही खंडकरी शेतकर्‍यांची दिशाभूल असल्याचा आरोप त्यांनी केला.

जिल्हा बँकेने कर्ज वितरणाबाबत नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. त्यात शेती महामंडळाकडून मिळालेल्या जमिनीसाठी कर्ज वितरण करताना वर्ग 1 धारण करणार्‍या शेतकर्‍यांनाच कर्ज द्यावे, असे या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. जमिन धारण करणारे जवळपास 80 टक्के सभासद हे वर्ग 2 च्या जमिनी धारण करणारे आहेत. यामुळे त्यांना कर्ज मिळणे दुरापास्त होणार आहे. याचा विचार करता जिल्हा बँकेने सदरची अट रद्द करावी. तसेच शासनाने खंडकरी शेतकर्‍यांना वाटप केलेल्या जमिनी वर्ग 1 धारणेच्या करुन द्याव्यात, अशी मागणी श्री. खंडागळे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या