Friday, April 26, 2024
Homeनगरकोकमठाणचे लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास क वर्ग दर्जा मंजूर - आ. काळे

कोकमठाणचे लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास क वर्ग दर्जा मंजूर – आ. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधी द्या, कोकमठाण येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास तीर्थक्षेत्र क वर्ग दर्जा मंजूर करण्यात यावा,

- Advertisement -

रांजणगाव देशमुख उपसा जलसिंचन योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्प मिळावा आदी मागण्या आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केल्या. सदर मागण्यांना पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास तीर्थक्षेत्र क वर्ग दर्जा मंजूर केला आहे, अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी उपस्थित असलेले आ. आशुतोष काळे यांनी पालकमंत्र्यांकडे मतदार संघाच्या विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली. सलग दोन वर्ष मोठ्या प्रमाणावर झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून या रस्त्यांसाठी भरीव निधी द्या. तसेच दुष्काळी गावातील रांजणगाव देशमुख, अंजनापूर, बहादराबाद, धोंडेवाडी, सोयेगाव, वेस, मनेगाव अशा सात गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून आहे.

या ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे वीजबिल थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वारंवार उद्भवणार्‍या वीज बिलाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्पाची मागणी केली.

या मागण्यांपैकी ना. मुश्रीफ यांनी लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास तीर्थक्षेत्र क वर्ग दर्जा मंजूर करून उर्वरित मागण्यांची देखील लवकरच पूर्तता करण्याची ग्वाही दिली. आ. काळे यांच्या प्रयत्नांतून मागील वर्षी श्रीक्षेत्र मयुरेश्वर देवस्थानला क वर्ग दर्जा देण्यात आला आहे. लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास क वर्ग दर्जा मंजूर केल्यामुळे या मंदिराकडे जाणारे रस्ते तसेच परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.

या बैठकीसाठी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, खा. सुजय विखे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, विमलताई आगवण, सोनाली साबळे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या