Thursday, April 25, 2024
Homeनगरशिर्डीत लहुजी सेनेचे अनोखे आंदोलन

शिर्डीत लहुजी सेनेचे अनोखे आंदोलन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

नगर मनमाड महामार्गावरील हॉटेल बंधनसमोर रस्त्याला मोठा खड्डा पडला असून त्यामुळे छोटे-मोठे अपघात घडत असतात. या अपघातातून साईभक्त, शालेय विद्यार्थी, ग्रामस्त यांचा मानसिक त्रास कमी व्हावा म्हणून भारतीय लहुजी सेनेच्यावतीने शिर्डी प्रांत कार्यालय, नगरपंचायत यांच्याकडे वारंवार लेखी निवेदन देऊन हा खड्डा त्वरित बुजविण्यासाठी अनेकवेळा मागणी केली होती. मात्र प्रशासन चालढकलपणा करीत असल्यामुळे निष्पाप लोकांचा बळी जाऊ नये या हेतूने काल दुपारी 4 वाजता गांधीगिरी मार्गाने अनोखे जागरण गोंधळ आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

- Advertisement -

या आंदोलनात भारतीय लहुजी सेनेचे राज्य कार्याध्यक्ष समीर वीर, परशुराम साळवे, भाऊसाहेब आव्हाड, मंजाबापू साळवे, दिपक साळवे, विश्वदीप पिंगळे, रुपेश आरणे आदींनी सहभाग घेतला. शिर्डी हे साईबाबांमुळे आंतर राष्ट्रीय तीर्थस्थान बनले असून येथे साईभक्त मोठ्या संख्येने येत असतात. इतर अवजड वाहनेही मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात. मात्र नगर-मनमाड महामार्गावरील हा खड्डा उद्या मृत्यूचा सापळा बनू शकतो. खड्ड्यात वाहने आदळून अनेक गाड्यांचे टायर फुटतात. म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदर खड्याच्या ठिकाणी फुल हार नारळ अर्पण करून प्रशासनाला जाग आणण्यासाठी जागरण गोंधळाचे लहुजी सेनेच्या पदाधिकार्‍यांनी पारंपरिक पद्धतीने हालगी वाजवत अनोखे आंदोलन केले.

यावेळी रामभाऊ पिंगळे यांनी पोतराज वेष परिधान करून देवीचा गोंधळ केला. या आंदोलनामुळे या खड्ड्याजवळ येणारी जाणारी वाहने थाबली. सर्वांनी या आंदोलनाचे कौतुक केले. याच ठिकाणावरून वाजत गाजत शिर्डी प्रांत अधिकार्‍यांना लेखी निवेदन देऊन सदर खडा दुरुस्त करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सदर मागणीची त्वरित दखल घेऊन प्रांताधिकारी यांनी सदर खडा त्वरित बुजविण्याचे नगर पंचायतला आदेश दिले. नगरपंचायतनेही सदर खडा त्वरित दुरुस्त करून शिर्डीकरांना न्याय दिला. या आंदोलनाची शिर्डी शहरात जोरदार चर्चा होती. या आंदोलनासाठी लहुजी सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले यावेळी शिर्डी पोलिस स्टेशनचे गोपनीय विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल श्री. वेताळ व पगारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

या खड्ड्याच्या अपघातातून मी बालबाल बचावलो – प्रांताधिकारी

मागणीचे निवेदन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना देत असताना आपण जो खड्या दुरुस्तीची मागणी करत आहात त्या खड्ड्याच्या अपघातातून बचावलो. मी दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी प्रवास करत असताना माझ्या वाहन चालकाने गाडीचा वेग मर्यादित केल्याने मी साईबाबा व शिर्डीकर सर्वसामान्य माणसाच्या आशीर्वादामुळेच बालंबाल बचावलो. त्यामुळे हा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याचे मी हे माझे कर्तव्य समजतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या