Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानिधी उपलब्ध होऊनही असमन्वय

निधी उपलब्ध होऊनही असमन्वय

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध होऊनही विविध विभागांमधील असमन्वय कायम असल्याचे स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाले. निधी नियोजनावरून नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनाचे वाभाडे काढलेले असताना देखील विविध विभागांमधील असलेला असमन्वय समोर आला.

- Advertisement -

अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी सर्व विभागप्रमुखांना त्यांनी प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांच्या याद्या बांधकाम विभागाकडे देण्याच्या सूचना दिल्या. शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण विभागाचे नियोजन पूर्ण होऊन सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. मात्र, महिला व बालकल्याण वगळता इतर विभागांनी बांधकाम विभागाकडे प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची यादी दिलेली नाही. प्रशासकीय मान्यता देऊन पंधरा दिवस उलटूनही या याद्या न मिळाल्यामुळे बांधकाम विभागाला पुढील कार्यवाही करता आलेली नसल्याची बाब सभेत उघड झाली. यावर, भाजप गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी प्रशासनाला धारेवर धरत, मार्च एण्डला निधी कसा खर्च होणार? असा संतप्त सवाल केला.

डॉ. कुंभार्डे यांनी नियोजनाचाही मुद्दा उपस्थित केला. नियोजनाचा गोंधळ मिटल्यानंतर सर्व विभागांनी नियोजन करून प्रशासकीय मान्यताही दिल्या. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण, आरोग्य, शिक्षण या विभागांचे बांधकामासंबंधीची कामे मंजुरीनंतर बांधकाम विभागाकडे दिले जातात. त्यानंतर कामांचा आराखडा, निविदा व कार्यारंभ आदेश देऊन ती कामे मार्गी लावली जातात. मात्र, महिला व बालकल्याण विभाग वगळता शिक्षण व आरोग्य विभागाने त्यांच्या मंजूर कामांची यादी बांधकाम विभागाकडे पाठवली नाही. यामुळे या कामांबाबत बांधकाम विभागाकडून कार्यवाही झालेली नाही. याबद्दल डॉ. कुंभार्डे यांनी नाराजी व्यक्त करत, प्रशासनाला खडेबोल सुनावले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी यात लक्ष घालण्याची मागणी केली.

महिला पदाधिकारी, अधिकार्‍यांचा गौरव

महिला दिनाचे औचित्यसाधून महिला पदाधिकारी सुरेखा दराडे, आश्विनी आहेर, सुशीला मेंगाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, समिती सदस्या सविता पवार, छाया गोतरणे, किरण थोरे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनंदा नरवडे यांचा यावेळी सभागृहाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच अति. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या