कामगार कायदा नवीन संहितेबाबत लेखी सूचना कळवा

jalgaon-digital
2 Min Read

नेवासा |तालुका प्रतिनिधी|Newasa

केंद्र शासनाने कामगार विभागाअंतर्गत विविध 29 कामगार कायदे एकत्रित करून वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020,

सामाजिक सुरक्षा संहिता 2020, व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्यस्थळ परिस्थिती संहिता 2020 विधेयके 23 सप्टेंबर रोजी पारित केली आहेत. या नवीन संहितेबाबत विविध कामगार संघटनांनी लेखी सूचना कळवाव्यात, असे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

नवीन कामगार संहितेबाबत राज्यातील कामगार संघटनांची मते जाणून घेण्यासाठी कामगार मंत्री दिलीप वळसेपाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील कामगार आयुक्तालय येथे बैठक झाली. या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, आमदार भाई जगताप, कामगार विभागाच्या सचिव विनिता वेद- सिंघल, कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासह विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कामगार मंत्री श्री. वळसे- पाटील म्हणाले की, कामगार कायदा आणि कामगार चळवळींच्या अभूतपूर्व इतिहासाला धक्का न लावता महाराष्ट्रात कामगारांचे हक्क आणि कायदे अबाधित ठेवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या कामगार संहितांचे सादरीकरण कामगार विभागाकडून 7 ऑक्टोबर 2020 रोजी राज्य मंत्रिमंडळासमोर करण्यात आले होते.

या सादरीकरणाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन कामगार संहितेबाबत सर्व संबंधित कामगार संघटनांशी संवाद साधून त्यांचे कामगार संहिताबाबत मते जाणून घेण्यात यावीत असे सांगितले होते. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

आमदार भाई जगताप यांनी महाराष्ट्र राज्याने कामगारांना न्याय देणारा कायदा अंमलात आणून कामगारांना न्याय द्यावा,अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उपस्थित विविध कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी आपापली मते नोंदवली.

केंद्र शासनाने कामगार विभागाअंतर्गत विविध 29 कामगार कायदे एकत्रित करून चार विधेयके पारित केली आहेत. चर्चेदरम्यान सध्याची स्थिती आणि नवीन कायदा आल्यानंतरची स्थिती कशी असेल हे संगणीकृत सादरीकरणातून मांडण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *