Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशकरोनामुळे यंदा 30 दिवसांचाच कुंभमेळा

करोनामुळे यंदा 30 दिवसांचाच कुंभमेळा

नवी दिल्ली –

एरवी किमान 2 महिन्यांच्या कालावधीसाठी भरवला जाणारा कुंभमेळा यंदा करोना संकटामुळे अवघ्या 30 दिवसांचाच होणार आहे. 1 एप्रिल ते 30 एप्रिल यादरम्यान हरिद्वार येथे हा कुंभमेळा पार पडणार आहे. उत्तराखंडच्या मुख्य सचिवांनी यंसंदर्भातली माहिती दिली असून मार्च महिना अखेरपर्यंत तारखांची घोषणा केली जाणार आहे.

- Advertisement -

करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार येथे करोनाचा हॉटस्पॉट बनण्याची शक्यता लक्षात घेता कुंभमेळ्याचा कालावधी केवळ 30 दिवसांचाच ठेवणार असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी दिली आहे.

यासंदर्भात मार्च महिना अखेरीपर्यंत संबंधित यंत्रणांना आदेश दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने करोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या आहेत.

कुंभमेळ्यासाठी येणार्‍या प्रत्येक भाविकाला 72 तास आधी करोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. कुंभमेळ्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट पास दिले जातील. ते मिळवण्यासाठी ओळखपत्र व वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. महाकुंभमेळा 2021 च्या वेबसाईटवर प्रत्येक भक्ताने नोंदणी करणे आवश्यक आहे. फक्त नोंदणी झालेल्या भाविकांनाच कुंभमेळ्याच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा परिसरामध्ये सामुहिक भजन किंवा भंडार्‍याचेआयोजन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पवित्र स्नानाच्या दिवशीच कुंभमेळा परिसरातील दुकानांना उघडण्याची परवानगी असेल. त्यातही औषधे, अन्न, दूध, पूजा साहित्य आणि ब्लँकेट्स अशा वस्तूंची किंवा पदार्थांची विक्री करणार्‍या दुकानांनाच परवानगी दिली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या