Monday, April 29, 2024
Homeनगरआर्द्राच्या पावसामुळे तालुक्यातील पिकांना संजीवनी

आर्द्राच्या पावसामुळे तालुक्यातील पिकांना संजीवनी

पारनेर- जून महिन्याच्या सुरुवातीस तालुक्यात पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर मूग, वाटाणा यांची पेरणी केली होती. पेरणीनंतर पावसाने पाठ फिरविली तेव्हा शेतकर्‍यांत काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्यातील बहुतांश भागात आर्द्रा नक्षत्राच्या पावासाने काही प्रमाणात हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे.

पारनेर तालुक्यातील खरीप हंगामात सुपा, पानोली, पारनेर, गोरेगाव, कान्हूर पठार, राळेगणसिद्धी, वाडेगव्हाण, आळकुटी, लोणीमावळा यासह अनेक गावांत मुगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदाच्या वर्षी मुगाची तालुक्यात 16,428 हेक्टरवर पेरणी झाली आहे.

- Advertisement -

वाटाणा पिकाला पठार भागातील शेतकरी कमी वेळात, कमी खर्चात चांगले उत्पादन मिळते म्हणून पसंती देतात. कान्हूर पठार, पिंपळगाव रोठा, पारनेर, पुणेवाडी, गोरेगाव, करंदी, किन्ही यासह तालुक्यातील अनेक गावांत वाटाण्याचे उत्पादन घेतले जाते. यंदा 3708 हेक्टरवर वाटाण्याची पेरणी झाली आहे.

बाजरी 22000 हेक्टर, वाल 434 हेक्टर, मटकी 90 हेक्टर, हुलगा 75 हेक्टर, उडीद 62 हेक्टर, वाटाणा 3798 हेक्टर, मूग 16,428 हेक्टर, मका 1105 हेक्टर, कांदा 2327 हेक्टर, एकूण 56158 हेक्टरवर पेरणी, लागवड झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर यांनी दिली.

तालुक्यातील सुमारे 22 हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. निघोज, वडझिरे, टाकळीढोकेश्वर, देवी भोयरे यासह अनेक गावांत बाजरीचे बियाणे निकृष्ट निघाल्याने बाजरीची उगवण झाली नाही. दुबार पेरणी करण्याच्या काळजी बरोबरच शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत दरवर्षी कांद्याचे भाव वाढतात; असा शेतकर्‍यांचा अंदाज असल्याने निघोज, जवळा, नारायणगव्हाण, वाडेगव्हाण, राळेगण थेरपाळ, या गावांसह कुकडी लाभक्षेत्रातील 14 गावांमध्ये 1196 हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. या शिवाय भाजीपाला 2000 हेक्टर, फूल उत्पादन 100 हेक्टरवर होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या