Thursday, April 25, 2024
Homeनगरसाई मंदिरात कृष्ण जन्मोत्सव साजरा

साई मंदिरात कृष्ण जन्मोत्सव साजरा

शिर्डी | शहर प्रतिनिधी

श्री साईबाबांच्या शिर्डीत गोकुळाष्टमी उत्सवाची परंपरा श्री साईबाबांच्या हयातीपासून सुरू असून या उत्सवाला सुमारे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ लोटला असून आज (शुक्रवारी) साईमंदीरात गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या भक्तीभाव वातावरणात साजरा करण्यात आला.

- Advertisement -

संस्थानच्या वतीने “गोपालकाला” निमित्ताने श्री साईबाबा समाधी मंदिराच्‍या समोरील स्‍टेजवर सकाळी १० ते १२ यावेळेत गोपालकाला कीर्तन झाले. त्‍यानंतर दुपारी १२ वाजता श्री साईसमाधी मंदिरात दहीहंडी फोडण्‍यात आली. यावेळी श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, विश्वस्त अँड सुहास आहेर,अविनाश दंडवते, जयवंतराव जाधव, महेंद्र शेळके, डॉ.एकनाथ गोंदकर, सुनिल शेळके, सचिन कोते, सहआयुक्त आयकर विभाग नासिक संजय धिवरे, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान बाबा समाधिस्त होण्यापूर्वी राधाकृष्ण आईच्या पुढाकारातून गोकुळाष्टमी उत्सवाला सुरुवात झाली होती. साईबाबा दिवसाआड चावडीत झोपत असे. श्रीकृष्णाचा जन्मकाळ रात्रीत असल्याने गोकुळाष्टमीची रात्र बाबांच्या चावडीच्या दिवशी आली तरच कृष्णजन्म त्यांच्यासमोर चावडीत केला जात. द्वारकामाईत रात्री ठराविक भक्तांशिवाय इतरांना जाण्याचा रिवाज नसल्याने बाबा ज्या रात्री द्वारकामाई असंत त्या रात्री गोकुळाष्टमी असल्यास जन्मोत्सव साजरा करणे शक्य नसे. 1918 साली श्री साईबाबा समाधिस्त झाल्यानंतर शिर्डीतील चार मुख्य उत्सवाच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये गोकुळाष्टमी उत्सवाची जबाबदारी परमसाईभक्त तात्या कोते यांच्याकडे सोपवला होता.

काळाच्या ओघात हा उत्सव मागे पडला असून आता जन्माष्टमीच्या रात्री मंदिरात कृष्ण जन्माचा कार्यक्रम पार पडतो. गोकुळाष्टमी कधी काळी साईबाबा संस्थानच्या प्रमुख उत्सवातील चौथा उत्सव होता. याची आज दुर्दैवाने अनेकांना माहिती देखील नाही.श्री साईबाबा संस्थानमध्ये आज रामनवमी, गुरुपौर्णिमा व दसरा हे तीन मुख्य उत्सव साजरे करण्यात येत असले तरी, साईबाबांच्या हयातीत व नंतरही अनेक वर्ष सुरू असलेल्या गोकुळाष्टमी उत्सवाला मात्र कालौघात मर्यादित स्वरूप प्राप्त झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला श्रावणातील श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा व कृष्णजन्माष्टमीचा कार्यक्रम एकत्र जोडले तर साईसाक्षीने सुरू झालेला हा आठ दिवसांचा उत्सव पुनर्जीवित होऊ शकेल. असे असले तरी क्रांती युवक मंडळ, बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळ, स्वराज ग्रुप, जय महाराष्ट्र, बजाव ग्रुप आदीसह शिर्डी शहरातील विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षाच्या वतीने पालखी मार्गावर शेकडोंच्या संख्येने दहिहंडी बांधण्यात आल्या होत्या. कोव्हिडच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर शिर्डी शहरात दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने पालखी मार्गावरून श्री साईबाबांच्या रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी रथाचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या