Tuesday, April 23, 2024
Homeनाशिककृषीरेल्वे आठवड्यातून दोन वेळा धावणार

कृषीरेल्वे आठवड्यातून दोन वेळा धावणार

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

देशातील पहिली किसान रेल्वे नाशिकमधून सुरु करण्यात आली आहे. या रेल्वेद्वारे शेतकर्‍यांचा शेतमाल थेट परराज्यात विक्रीसाठी पाठविण्याची जलद सुविधा सुरु झाली असून या किसान रेल्वेला शेतकर्‍यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

कृषीरेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करण्यात यावी, अशी मागणी खा.हेमंत गोडसे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यासह कृषीमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. ही मागणी न्यायिक असल्याने रेल्वेसह कृषी मंत्र्यालयाकडून कृषी रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सोडण्याला परवानगी देण्यात आल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली.

ऑगस्ट महिन्यापासून सुरु करण्यात आलेल्या किसान रेल्वेला गेल्या तीन आठवड्यात शेतकर्‍यांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचे उपलब्ध आकडेवाडीवरुन स्पष्ट होत आहे. शेतमालाची वाढती आवक तसेच परराज्यात आपला शेतमाल विक्रीसाठी पाठविण्याची शेतकर्‍यांधील सकारात्मक भावना लक्षात घेता कृषी रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत होती.

शेतकर्‍यांच्या मागणीची गंभीर दखल घेत खा.गोडसे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासह कृषिमंत्र्यांकडे ही रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करावी, यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. तसेच कृषीरेल्वे संदर्भात खा.गोडसे यांनी नाशिक रेल्वे स्थानकाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा यांच्याशी चर्चा करुन माहिती देखील जाणून घेतली.

ऑगस्ट महिन्यात तीनवेळा सोडण्यात आलेल्या कृषिरेल्वेत पहिल्या फेरीत (दि.7) रोजी 73 टन कृषिमाल, (दि.14) रोजी 98 टन, (दि.21) रोजी 151 टन शेतमाल (भाजीपाला) निर्यात करण्यात आलेला आहे. यापुढे ही कृषीरेल्वे आठवड्यातून मंगळवार व शुक्रवारी देवळाली रेल्वे स्थानकातून सोडण्यात येणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना योग्य बाजार उपलब्ध होणार आहे.

किसान रेल्वेला शेतकर्‍यांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून दरवेळी रवाना होणार्‍या कृषिमालाच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे यापुढील हंगामाचा विचार करता ही रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला आहे. तसेच नोडेल एजन्सी ही देखील नाफेड असली तर शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होण्यास मदत होईल.

खा.हेमंत गोडसे

- Advertisment -

ताज्या बातम्या