Wednesday, April 24, 2024
Homeनगरकोतवालीचे पोलीस निरीक्षक वाघ निलंबित

कोतवालीचे पोलीस निरीक्षक वाघ निलंबित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोतवाली पोलीस ठाण्याचा तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला विकास वाघ याच्याविरूद्ध

- Advertisement -

अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी वाघ यांना पोलीस दलातून निलंबित केले आहे. शहर पोलीस उपअधीक्षक तथा तपासी अधिकारी विशाल ढुमे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान, गुन्हा दाखल होऊन 15 दिवस झाले तरीही निरीक्षक वाघ याला अटक झालेली नाही.

एका तरुणीला बंदुकीचा धाक दाखवून व मारहाण करत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी वाघ याच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात 29 सप्टेंबर रोजी अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे. 2019 मध्ये तक्रार देण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणीवर कोतवाली पोलीस ठाण्याचा तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ याने या तरुणीबरोबर ओळख केली.

काही दिवसांनंतर या तरुणीच्या घरी जाऊन वाघ याने तिच्यावर अत्याचार केला. तरुणीने विरोध केल्यानंतर तिला बंदुकीचा धाक दाखवून कंबरपट्ट्याने मारहाण करण्यात आली. यानंतरही वाघ याने या तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केला. या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने 29 सप्टेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

वाघ याच्याविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाघ पसार झाला आहे. दरम्यान वाघ याच्याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर वाघ याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या