कोठला परिसरातील कत्तलखान्यावर एलसीबीचा छापा

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोठला परिसरात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. या कारवाई दरम्यान दोन लाख 39 हजार 850 रूपये किंमतीचे 1100 किलो गोमांस, दोन जिवंत जनावरे व साधने जप्त करण्यात आली आहे. गुरूवारी सकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मोसीन बाबामियाँ कुरेशी (वय 41 रा. कोठला), सलीम बाकर कुरेशी (वय 19), राजीक अफरोज कुरेशी (वय 19, दोघे रा. बेपारी मोहल्ला) अशी त्यांची नावे आहेत. जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून जिल्ह्याभर अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येत आहे. कोठला येथील शहा स्टील फर्निचर शेजारील, हॉटेल कुरेशी पाठीमागे, पत्र्याच्या शेडमध्ये मोसीन कुरेशी हा गोवंशीय जातीची जिवंत जनावरे डांबुन ठेवुन त्यांची कत्तल करून गोमांसची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कटके यांना मिळाली होती.

त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार मनोहर शेजवळ, सुनील चव्हाण, संदीप पवार, संदीप घोडके, शंकर चौधरी, सचिन आडबल, संदीप चव्हाण, जालिंदर माने, सारीका दरेकर, चंद्रकांत कुसळकर व संभाजी कोतकर यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने येथील शहा स्टील फर्निचर शेजारील, हॉटेल कुरेशी मागे, पत्र्याच्या शेड जवळ जावुन खात्री केली असता चार व्यक्ती जनावराची कत्तल करत असताना पथकाने छापा टाकला.

त्यावेळी एक जण पळून गेला तर तिघे पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडे गोवंश कत्तलखान्याबाबत विचारपुस केली असता सदर कत्तलखाना हा मोसीन बाबामियाँ कुरेशी हा चालवत असुन गोमांस विक्री करत असल्याची कबुली दिली. या प्रकरणी अंमलदार पवार यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *