Wednesday, April 24, 2024
Homeनगरकोरठण खंडोबाचा चैत्र पौर्णिमा उत्सव साजरा

कोरठण खंडोबाचा चैत्र पौर्णिमा उत्सव साजरा

पारनेर |प्रतिनिधी| Parner

लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेले पिंपळगाव रोठा येथील स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा गडावर चैत्र पौर्णिमेेचा उत्सव साजरा करण्यात आला. हजारो भाविक भक्तांच्या गर्दीत यळकोट यळकोट जयमल्हारच्या घोषाणे गड दुमदुमून गेला होता.

- Advertisement -

शनिवारी पहाटे 4 वाजता देवाचे मंगल स्थान व पूजा संपन्न होऊन पहाटे 5 वाजता चांदीचे सिंहासन व चांदीच्या उत्सव मूर्तीचे अनावरण करण्यात आले.सकाळी सहा वाजता गोपीनाथ सुंबरे व मनीषा सुंबरे तसेच संभाजी मुंढे व सुनंदा मुंढे यांच्या हस्ते अभिषेक पूजा व महाआरती झाली. या प्रसंगी श्री ज्ञानदेव माऊली घुले, देवस्थानचे अध्यक्ष ऍड. पांडुरंग गायकवाड, अक्षय येवले शिरूर, रामदास मुळे, शांताराम खोसे व भाविक भक्त उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता श्री खंडोबा उत्सव मूर्तीची पालखीतून मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक सुरू झाली. ढोल-ताशांच्या तालावर पालखी मिरवणुकीत शेकडो भाविक भक्त सामील झाले होते, भंडार्‍याची मुक्त उधळण करत भाविक पालखी पुढे ओलांडा दर्शन घेत होते, कोरठणगड नगर प्रदक्षिणा करून पालखी विसावा स्थानावरून निघाल्यानंतर पारंपारिक लंगर तोडण्याचा विधी उत्साहात पार पडला. पालखीचे प्रस्थान होऊन पालखी मंदिर पायर्‍यांवर विराजमान झाल्यावर पौर्णिमा उत्साहाची अन्नदाते व पुजारी यांचे कडून पालखीला नैवद्य अर्पण करण्यात आला.

त्यानंतर पालखी मंदिरात परतल्यावर अन्नदान महाप्रसाद वाटप सुरू झाले. देवस्थान मध्ये श्री गणेश मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजनही करण्यात आले तसेच मंदिरातील शके 1492 मधील मोडीतील शिलालेखाचे मराठीत फलकामध्ये अनावरण मंदिरात करण्यात आले. पुणे, नगर, नाशिक, मुंबई, ठाणे इत्यादी शहरातून आलेल्या हजारो खंडोबा भाविकांनी चैत्र पौर्णिमेनिमित्त दिवसभर कुलदैवत खंडोबा दर्शनासाठी गर्दी केली होती, यावेळी विश्वस्त बन्सी ढोमे, दिलीप घोडके, देविदास क्षीरसागर, सुरेश गुंजाळ, प्रदीप जोशी, शिवाजी ढोमे, तसेच मुंढे परिवार व सुपेकर परिवार पालखी साठी उपस्थित होते.

कुलधर्म कुलाचारासाठी गर्दी

चैत्र पौर्णिमेला घराघरातून भाविक भक्तांनी कुलदैवताचे कुलधर्म कुलाचार पार पडण्यासाठी देवस्थानच्या सभामंडपात शेकडोंच्या संख्येने जागरण व गोंधळ विधीचे कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने सादर केले. कोरठणगड दिवसभर व रात्रभर जागरण व गोंधळ याच्या निनादाने व जयघोषाने दुमदुमत राहिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या