जेऊर पाटोद्यात बिबट्याने पाडला शेळीचा फडशा

jalgaon-digital
2 Min Read

सोनेवाडी (वार्ताहर)

कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील केकाण वस्तीवर मध्यरात्री 1.30 वाजता सोपान विश्वनाथ केकाण यांच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला चढवत गोठ्यात बांधलेली शेळी जखमी केली. कुत्रे भुंकण्याचा आवाजाने केकाण कुटुंब जागे झाले असता त्यांनी तेथून बिबट्याला पळवून लावले.

जखमी अवस्थेत असलेली शेळी गोठ्याच्या बाहेर ट्रॅक्टरच्या डाबरला बांधण्यात आली. मग मात्र बिबट्याने सर्व सामसूम झाल्यानंतर पुन्हा डाबरला बांधलेल्या शेळीला फडफडत नेत तिची शिकार केली. वन विभागाचे अधिकारी जाधव घटनास्थळी येत पायाच्या ठस्या वरून हा बिबट्याच असल्याचे सांगितले.

सकाळी उठल्यानंतर केकाण यांनी जखमी शेळीवर उपचार करण्याचे हेतूने शेळी बांधल्याच्या ठिकाणी गेले असता ट्रॅक्टरच्या डाबरला बांधलेले दोरखंड फक्त त्यांना आढळून आले. जखमी अवस्थेत बांधलेली शेळी बिबट्यानेच फरपडत नेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. माजी सरपंच सतीश केकाण यांना त्यांनी याबाबत माहिती दिली असता केकान घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता जाधव देखील घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी दाखल झाले. शेळी ओढत नेलेल्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे त्यांना आढळून आले व त्यांनी हा बिबट्याच असल्याचे जाहीर केले. परिसरातील नागरिकांनी सतर्क करावे असे आवाहनही त्यांनी केले. सध्या या परिसरात कांदा लावणी व गव्हाची पेरणी सुरू आहे. त्यामध्ये रात्रीची वीज विद्युत वितरण कंपनीकडून देण्यात येत आहे.

लावलेल्या कांद्याला व गव्हाला पाणी देणे गरजेचे असताना परिसरात बिबट्याच्या धास्तीने शेतकरी धास्तावले आहे.त्यामुळे वनविभागाने त्वरित या परिसरात पिंजरा लावा अशी मागणी माजी सरपंच सतीश केकान यांनी केली तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीने देखील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा असेही त्यांनी सांगितले. वन विभागाकडून येसगाव परिसरात असलेला पिंजरा जेऊर पाटोदा परिसरात बसवला जाईल असे आश्वासन जाधव यांनी दिले. जखमी शेळीचा पंचनामा झाला असता मात्र बिबट्याने शेळीच उचलून नेल्याने पंचनामा देखील करता आला नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *