Saturday, April 27, 2024
Homeनगरकोपरगाव 5 नंबर साठवण तलावाचा वाद पुन्हा चव्हाट्यावर

कोपरगाव 5 नंबर साठवण तलावाचा वाद पुन्हा चव्हाट्यावर

अन्यथा काळेंवर अब्रुनुकसानीचा दावा करणार- पराग संधान

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

आ. काळे यांचे सर्व आरोप बिनबुडाचे आहे. त्यांना फक्त कोल्हेंचे नाव घेतल्याशिवाय दुसरे काही सुचत नाही. तसेच त्यांचे मंत्रालयात वजन देखील वाढत नाही. आमच्यावर पाणी प्रश्नी केलेले आरोप त्यांनी सिद्ध करावे तसेच आम्ही कधी व कशासाठी कोणते वकील लावले त्यांची नावे सांगा अन्यथा आम्ही त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे पराग संधान यांनी बुधवारी सायंकाळी भाजपा संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

कोल्हे कुटुंबावर नुकतेच विरोधकांकडून पत्रकार परिषद, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाणी प्रश्नाबाबत आरोप करण्यात आले होते. याबाबत खुलासा करताना पराग संधान बोलत होते. यावेळी दत्ता काले, स्वप्निल निखाडे, रवींद्र पाठक, विवेक सोनवणे, वैभव गिरमे, रवींद्र रोहमारे, बापू पवार, सचिन सावंत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी संधान म्हणाले की, कोल्हे कुटुंबावर विरोधकांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून शेतकर्‍यांनी त्यांच्या सिंचनाच्या पाण्यासाठी याचिका केलेली आहे. ती तळ्याची नाही. मात्र काळे यांना कोल्हे यांच्यावर आरोप केल्याशिवाय त्यांची राजकीय गाडी देखील पुढे जात नसून त्यांचे मंत्रालयात वजन देखील वाढत नाही.

आ. काळे यांनी कोल्हे यांची जिरवा जिरवीच्या नादात कोपरगावकरांची जिरवली आहे. आम्ही पाच नंबर तलाव व निळवंडेला कधीही विरोध केलेला नाही आणि भविष्यातही नसेल.

काही काळे प्रेमींनी सांगितले की, आठ वकील लावले हे जर सिद्ध केलं नाही तर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. कोपरंगावच्या हक्काचे पाणी माजी आमदार अशोक काळे यांच्या काळात गेले. आ. आशुतोष काळे आता श्री साई संस्थानचे अध्यक्ष असून त्यांना विनंती आहे त्यांनी निळवंडे पाणी पाईपलाईन करावी व निळवंडेला आ. काळे यांनी केलेल्या विरोधाचे पाप त्यांनी निळवंडेचे पाणी आणून शहरावर केलेले पाप धूऊन काढावे, असेही शेवटी संधान म्हणाले.

कोल्हे गटाने अगोदर शहरातील नागरिकांची माफी मागावी- सुनील गंगुले

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

2019 पूर्वी देखील सर्व प्रकारची सत्तास्थाने ताब्यात असल्यामुळे कोल्हे गटाने 2019 पर्यंत 5 नंबर साठवण तलाव होऊ दिला नाही. 5 नंबर साठवण तलाव होऊ नये यासाठी पडद्यामागून कोल्हेंनी काय प्रयत्न केले हे शहरातील जनतेला माहीत आहे आणि 28 विकास कामांना कोण न्यायालयात घेऊन गेले हे देखील शहरातील जनतेने पाहिले आहे. मात्र पुन्हा एकदा आपला पडद्यामागून विरोध करण्याचा डाव फसल्यामुळे कोल्हेंना झालेल्या मनस्तापापायी अब्रू नुकसानीची भाषा कोल्हे गट करीत आहे. मात्र त्यापूर्वी त्यांनी आजपर्यंत शहर विकासाला विरोध केल्याबद्दल अगोदर कोपरगाव शहरातील जनतेची माफी मागावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केले आहे.

कोल्हे गटाचे पराग संधान यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याला उत्तर देताना श्री. गंगुले बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोल्हे गटाने आपल्या धारणगाव, ब्राम्हणगाव गावातील कार्यकर्त्यांकरवी न्यायालयात 5 नंबर साठवण तलाव, प्रसिद्ध झालेली निविदा व मंजूर करण्यात आलेले वाढीव पाणी आरक्षण स्थगित करावे अशा आशयाची याचिका औरंगाबाद खंडपीठाने नुकतीच फेटाळली आहे. त्यामुळे एक प्रकारे 5 नंबर साठवण तलावालाच विरोध करण्याचा कोल्हेंचा डाव फसला आहे.

5 नंबर साठवण तलावामुळे कोपरगाव शहराची तहान कायमची भागणार आहे याची जाण असलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 5 नंबर साठवण तलावासाठी किती संघर्ष केला आहे हे कोपरगाव शहरातील जनतेने पाहिले आहे. त्यांनी शहरातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून आपले राजकीय वजन वापरत 5 नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटी रुपये निधी मिळविला आहे.

त्यासाठी वाढीव पाणी देखील त्यांनी मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे शहरातील जनतेने हे सर्व श्रेय ना. आशुतोष काळे यांनाच दिले आहे. कारण ज्यावेळी ना. आशुतोष काळे 5 नंबर साठवण तलाव व्हावा यासाठी संघर्ष करीत होते. त्यावेळी शहरातील जनता त्यांच्यासोबत होती व या संघर्षाचे शहरातील नागरिक साक्षीदार आहेत. त्यामुळे आपण कुठेतरी बाजूला पडलो आहोत हे कोल्हे गटाला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे त्यांना पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करावी लागत असल्याचे सुनील गंगुले यांनी म्हटले आहे.

सर्व प्रकारची सत्ता असताना माजी आमदार कोल्हेंनी 5 नंबर साठवण तलाव होऊ नये यासाठी समृद्धीच्या ठेकेदारावर राजकीय वजन वापरून दबाव कोणी आणला होता? आजपर्यंत शहर विकासाला कोणी खोडा घातला होता हे कोपरगाव शहरातील जनता जाणून आहे.

– सुनील गंगुले

- Advertisment -

ताज्या बातम्या