Thursday, April 25, 2024
Homeनगरराज्य सरकारने कांद्याला विशेष अनुदान जाहीर करावे - स्नेहलता कोल्हे

राज्य सरकारने कांद्याला विशेष अनुदान जाहीर करावे – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कष्टाने पिकविलेला कांदा चाळीमध्ये खराब झाला तर दुसरीकडे बाजारभाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला विशेष अनुदान जाहीर करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, स्नेहलता कोल्हे यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून जगासह देशभरात करोना आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. महाराष्ट्रातही या आजाराचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या बाजारपेठांमुळे शेतकर्‍यांनी पिकविलेल्या माल विक्री अभावी खराब झाल्याने शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.

या आर्थिक विवंचनेतून जात असताना काढलेले कांदा पीक साठवून ठेवले. त्याचेही नुकसान झाले. सध्याच्या कोसळलेल्या दरामुळे कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादनासाठी केलेल्या खर्चाच्या निम्मा खर्चही पदरात पडला नाही. अशा चोहोबाजूने संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना सरकारने दिलासा देण्यासाठी कांद्याला अनुदान जाहीर करावे.

मागील सरकारच्या काळात कांदा बाजारभाव घसरणीच्या काळात तत्कालीन सरकारने कांद्यासाठी प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देऊन शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम केले होते. या सरकारनेही कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांद्याला विशेष अनुदान देण्याची मागणी सौ.कोल्हे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या