कोपरगाव नगरपालिका अधिकार्‍यावर केलेल्या आरोपांविरोधात काम बंद आंदोलन

jalgaon-digital
2 Min Read

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

नगरपरिषदेचे प्रभारी नगर अभियंता आबाच्या टपरीवर बसून ठेकेदाराची पाकीटे घेतात, असा मानहानीकारक व बदनामी होईल असे जाहीररित्या आंदोलनामध्ये विधान केल्याच्या व पालिकेतील अधिकारी यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव नगर पालिकेचे अधिकारी कर्मचारी संघटनेने भाजप व मनसेच्या पदाधिकारी यांचा निषेध करत काम बंद आंदोलन केले.

कोपरगाव नगर परिषदेत शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात भाजपने नुकतेच निवेदन दिले होते. मात्र यावेळी झालेल्या भाषणांमध्ये अधिकारी यांच्यावर झालेल्या आरोपांविरुद्ध कोपरगाव नगर पालिका कर्मचारी अधिकारी संघटनेने काम बंद आंदोलन केले. यावेळी भाजपाच्या झालेल्या बैठकीत आरोग्य, पाणीपुरवठा व शहरातील विकास कामांबाबत चर्चा झाली होती. तसेच नगरपरिषदेमध्ये पूर्णवेळ बांधकाम अभियंता कार्यरत नाही. अपुरे मनुष्यबळ, नगरपरिषदेच्या आर्थिक अडचणी याबाबतची वस्तुस्थिती निवेदन स्विकारताना लक्षात आणून दिली.

स्थानिक गटातटाच्या राजकारणामुळे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचेवर कोणताही आधार नसताना बेछुट आरोप करण्यात आले. नगरपरिषदेचे साठवण तलावातील पाणी पातळी खाली गेल्यामुळे शेवाळयुक्त पाणी पुरवठा मागील आठवड्यात काही प्रमाणात झाला होता. परंतु वस्तुस्थिती लक्षात न घेता अधिकारी, कर्मचारी यांचेवर आरोप केले जातात. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी नगरपरिषदेचे प्रभारी नगर अभियंता आबाच्या टपरीवर बसून ठेकेदाराची पाकीटे घेतात असा मानहानीकारक व बदनामी होईल असे जाहीररित्या आंदोलनामध्ये विधान केले होते.

यामध्ये शहरातील सर्वच स्तरावर निषेध करण्यात आला होता. याबाबत नगरपरिषदेतील अखिल भारतीय सफाई कामगार संघटना, नगरपरिषद कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य संवर्ग कर्मचारी संघटना यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून त्याचा जाहीर निषेध केला. नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी यांच्यावर केलेले वैयक्तीक राजकीय स्वार्थापोटी, राजकीय हेतूने नाहक बदनामी करण्याच्या मानसिकतेचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. सदर आंदोलनामध्ये नगरपरिषद ठेकेदार संघटनाही सहभागी झाली होती. नगरपरिषद ठेकेदार यांनी जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी व राजकीय पोळी भाजण्यासाठी बेछुट आरोप करीत असल्याचे मत व्यक्त केले. या गोष्टीचा जाहीर निषेध केला. कोपरगाव शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्याधिकारी यांनी सदर आंदोलन मागे घेण्याबाबत विनंती केली. त्यास प्रतिसाद म्हणून कर्मचार्‍यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *