Friday, April 26, 2024
Homeनगरकोपरगाव बाजार समितीवर पुन्हा प्रशासक

कोपरगाव बाजार समितीवर पुन्हा प्रशासक

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव नामंजूर करत बुधवारी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सहायक निबंधक एन. जी. ठोंबळ यांची बाजार समितीच्या प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रशासक ठोंबळ यांनी बुधवारी पदभार स्वीकारला.

- Advertisement -

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळे गट, कोल्हे गट, परजणे गट, औताडे गट व वहाडणे गट यांच्या संचालक मंडळाच्या सहमती एक्सप्रेसने कारभार हाकला. याच संचालक मंडळाची 29 ऑक्टोबर 2020 रोजी मुदत संपली होती. शासनाने करोनामुळे कोणत्याच निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 8 ऑक्टोबर 2020 रोजीच मंत्रालयात मुदतवाढीचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर संचालक मंडळाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना मुदतवाढ न देता 7 डिसेंबर 2020 ला बाजार समितीचा कारभार प्रशासक म्हणून सहायक निबंधक एन. जी. ठोंबळ यांच्या हाती देण्यात आला होता.

मात्र, ही नियुक्ती करताना संचालक मंडळाच्या मुदतवाढी प्रस्तावासंदर्भात कोणतही निर्णय दिलेला नव्हता. संचालक मंडळाने या नियुक्तीवर आक्षेप घेत 16 डिसेंबरला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड पिठात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल 7 एप्रिल 2021 ला निकाल देत बाजार समितीचा कारभार पुन्हा संचालक मंडळाच्या हाती देण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या एस. व्ही. गंगापूरवाला व श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने संचालक मंडळाच्या बाजूने नर्णय देताना म्हटले होते, कोपरगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या मुदतवाढीच्या प्रस्तावावर राज्य शासनाने करोना महामारीच्या परीस्थीतीचा विचार करून नव्याने निर्णय घ्यावा.

तसेच संचालक मंडळाविरुद्ध येणार्‍या तक्रारींची नोंद घ्यावी. राज्य शासनाने मुदतवाढीच्या प्रस्तावावर निर्णय देईपर्यंत संचालक मंडळाने कोणतेही विधायक निर्णय घेऊ नये असे स्पष्ट केले होते. त्यानुसार उच्च न्यायालय व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या आदेशानुसार सोमवार दि. 19 एप्रिल 2021 रोजी प्रशासक पद बरखास्त करून पुन्हा संचालक मंडळाच्या हाती कारभार देण्यात आला होता. खंडपीठाच्या मुदतवाढीच्या प्रस्तावावर नव्याने विचार करून बुधवारी संचालक मंडळ बरखास्त करून दुसर्‍यांदा प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या