Friday, April 26, 2024
Homeनगरकोपरगाव पालिकेत काम बंद आंदोलन

कोपरगाव पालिकेत काम बंद आंदोलन

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

ठाणे जिल्ह्यातील कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकूहल्ला केल्याने त्यांची दोन बोटे तुटल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.याच्या निषेधार्थ कोपरगाव नगरपालिकेच्यावतीने एकदिवसीय काम बंद आंदोलन करून मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .

- Advertisement -

यावेळी आयोजित निषेध सभेत मुख्याधिकारी शांताराम गोसावी म्हणाले, कर्तव्य बजावत असताना महिला अधिकार्‍यांवर भ्याड वृत्तीने हल्ला होणे ही निंदनीय बाब आहे. दुर्दैवाने त्यांच्या हाताची बोटे तुटली. या घटनेचा महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटनेच्यावतीने निषेध करतो. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचे पावित्र्य जपले जात असताना महिलेवर हल्ला होतो ही क्लेशदायक घटना आहे. प्रामाणिकपणे चांगली सेवा कशी देता येईल हे कार्य बजावत असतानाच ही घटना घडली.त्यामुळे हे हल्ले महिलांच्या प्रगतीवर होत आहे. असे हल्ले करणार्‍यांकडे समाज चांगल्या नजरेने बघत नाही. आम्ही या अधिकारी कर्मचार्‍यांच्यामागे पूर्ण ताकदीने उभे आहोत.

या हल्ल्याची तमा न बाळगता आमची सेवा बजावत राहणार. हा हल्ला महिलेवर झालेला हल्ला नसून संपूर्ण कर्मचार्‍यांच्यावर झालेला असून याचा निषेध आहे. निवेदनात म्हटले आहे, करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अतिरिक्त कामाचा ताण असून देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावणार्‍या अधिकार्‍यावर हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे. सदरील गुन्हेगारावर कडक स्वरूपाची कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

हा केवळ एका अधिकार्‍यावरील हल्ला नसून असे भ्याड हल्ले संपूर्ण नोकरशाहीलाच जायबंदी करतात. त्यामुळे या घटनेचा जाहीर निषेध म्हणून कोपरगाव नगरपरिषदेचे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण कामकाज कडकडीत बंद करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मुख्याधिकारी शांताराम गोसावी, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, बांधकाम अभियंता दिगंबर वाघ, पाणी पुरवठा अभियंता ऋतुजा पाटील, तुषार नालकर, राजेंद्र गाडे, चंद्रकांत साठे, रोहित सोनवणे, स्वेता शिंदे, दीपक बडगुजर, नितेश मिरीकर, रवी वाल्हेकर, सुनील आरण यांसह अधिकारी व कर्मचार्‍यांनी सह्या केल्या आहेत.

ठाणे येथे कर्तव्य बजावणार्‍या महिला अधिकार्‍यांवर झालेल्या हल्ल्याचा करावा तितका निषेध कमी आहे. गत महिन्यात कोपरगाव पालिकेच्या अधिकार्‍यावर हल्ला झाला. ते गुंड माझ्याकडे का आले नाहीत. देश सेवा केलेल्या अधिकर्‍यावर हल्ला करतात.या गुंडामध्ये हिम्मत असेल तर एक एकट्याने लढावे. अवैध टपर्‍या टाकून दहशत निर्माण करणार्‍या गुंडांना कुणी घाबरणार नाही. पालिका कर्मचारी व अधिकार्‍यांवर अन्याय झाला तर आम्ही कर्मचार्‍यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू.

– नगराध्यक्ष विजय वहाडणे

- Advertisment -

ताज्या बातम्या