कोनांबे, बोरखिंड बंधारा ओव्हरफ्लो

jalgaon-digital
2 Min Read

सिन्नर । वार्ताहर sinnar

तालुक्यातील 55.65 दलघफू क्षमतेचे बोरखिंड धरण व 54.50 दलघफू क्षमतेचे कोनांबे धरण रविवारी (दि.30) ओव्हरफ्लो झाले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धोंडबार-औंढेवाडी डोंगर पट्ट्यात दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो होऊन त्यातील पाणी दारणा व देवनदीला जाऊन मिळाले आहे. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील पूर्व भागात पावसाचे प्रमाण अजूनही अत्यल्प आहे. मात्र, पश्चिम पट्ट्यात औंढेवाडी भागात पाऊस असल्याने ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन्ही धरणे जवळपास 15 दिवस उशिरा ओव्हरफ्लो झाली. यावेळी बोरखिंडचे सरपंच गणेश कर्मे, लक्ष्मण कवटे, ग्रामस्थ नारायण पाडेकर, वसंत सिंह परदेशी, राजेंद्र परदेशी यांनी धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर जलपूजन केले. कोनांबे धरण भरल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या आठ गावांना संजीवनी मिळाली आहे.

धरणातून देवनदी पात्रात पाणी आल्याने नदी प्रवाहित झाली आहे. त्यामुळे पूर्व भागातील नदीकाठच्या गावांतील शेतकर्‍यांच्या आशा उंचावल्या आहेत. तसेच कुंदेवाडी-सायाळे आणि खोपडी-मिरगाव या बंदिस्त पूरचारीतून अवर्षणग्रस्त गावांना पाणी कधी मिळेल याची पूर्व भागातील शेतकर्‍यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, सरदवाडी धरणामध्ये पाण्याची अल्पशा प्रमाणात आवक सुरू झाल्याने पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे तर भोजापूर धरणातही म्हाळुगी नदीतून पाण्याची काही प्रमाणात आवक सुरु झाली आहे.

150 हेक्टर क्षेत्राला लाभ

बोरखिंड धरणावर बोरखिंड, घोरवड आणि शिवडा येथील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. या पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळाली आहे. परिसरातील सुमारे 100 ते 150 हेक्टर शेतीला धरणातील पाण्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या सिंचनाचा लाभ होत असल्याने शेतकर्‍यांचे चेहरे फुलले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *