Friday, April 26, 2024
Homeनगरकोळपेवाडी ग्रामपंचायत निवडणूक तिन्ही गटांचे विजयाचे दावे, आज फैसला

कोळपेवाडी ग्रामपंचायत निवडणूक तिन्ही गटांचे विजयाचे दावे, आज फैसला

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील राजकीय दृष्ट्या बहुचर्चित कोळपेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत 4 हजार 752 मतदारांपैकी 3 हजार 680 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरपंच पदासाठी 3 तर 13 सदस्य पदांसाठी 29 जणांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले. आज तहसील कार्यालय कोपरगाव येथे मतमोजणीत फैसला होणार असला तरी तिनही गटाने विजयाचे केलेले दावे कितपत यशस्वी होतात यासाठी काही क्षणाचा अवधी बाकी आहे. सरपंच व सदस्य त्यांच्या मनातील धाकधूक कमी करण्यासाठी मतदारांचा कौल घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

कोळपेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांचे पारंपरिक विरोधक काळे-कोल्हे गटाने निवडणूक बिनविरोध करण्याचा डाव राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर परिवर्तन पॅनलने उधळून लावत लोकशाही मार्गाने निवडणूक लादली. कोळपेवाडीतील काळे – कोल्हे घराण्याने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता झाली नाही. हा मुद्दा प्रचारात जनतेला विशेष भावल्याने मतदाराच्या तोंडून परिवर्तन घडवायचेच हा शब्द वारंवार कानी पडत होता. मागील पंचवार्षिक निवडणुकीत काळे गटाने एकहाती सत्ता प्रस्थापित करत कोल्हे गटाचा दारुण पराभव केला.

कोल्हे गटाचा एकही सदस्य निवडून न आल्याने त्यांनी सदस्यांचे सरकारी जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा बाहेर काढून 9 सदस्यांना अपात्र केले. त्या जागेवर पोट निवडणुकीतही काळे गटाने नऊच्या नऊ जागा ताब्यात घेतल्या. विकास कामांद्वारे जनतेमध्ये सत्तेची प्रतीमा सरपंच सूर्यभान कोळपे यांनी उतरवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र प्रामाणिक कार्यकर्ते टिकवून ठेवण्यात व जोडण्यात ते अपुरे ठरले. सरपंच सूर्यभान कोळपे यांना सत्तेवर बसवण्यासाठी अनेक राजकीय उन्हाळे पावसाळे अनुभवले. सुकाणु समिती सदस्यांना सत्ता काळात दूर लोटले .चमकोगिरी कार्यकर्त्याना सहकार उद्योग समुहात नोकरी व मलईचे टेंडर मिळाल्याने प्रामाणिक कार्यकर्ते नेतृत्वा बद्दल असमाधानी होते.

गावची सत्ता काबीज करण्यासाठी कोल्हे गट कासवाची चाल ठेवून सावज जाळ्यात येण्याची वाट पाहत होता. जाळ्यात सरपंच अलगद सापडून उद्योग समुहात मिळालेल्या संचालक पदाच्या एकत्रीत सत्कारातून हम सब एक है चा संदेश जनतेच्या चांगलाच जिव्हारी लागला. कोळपेवाडीच्या राजकारणात कोल्हे गटाची भूमिका हि पुर्वेकडील नेत्यांना उठबस करण्याचे हक्काचे ठिकाण व निवडणुकीत 1/3 मतदानाचा एक गठ्ठा व त्या बदल्यात संचालक पद स्वतःकडे ठेवण्यासाठी एकहाती कारभार असलेले नेतृत्व इतकेच काय ते.

या निवडणुकीत काळे गटाने ठेकेदार व जनतेच्या मनामध्ये स्थान नसणार्‍या घटकांनाच उमेदवारी दिल्याने ग्रामस्थांच्या नाराजीचा सामना प्रचारामध्ये काळे गटाने अनुभवला. राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर परिवर्तन पॅनलचे शिलेदार कैलास कोळपे, शब्बीर शेख, रमेश भोंगळ आदींनी प्रचारात आघाडी घेऊन जनतेच्या मनात आपले स्थान मजबूत करण्यासाठी मतदारांना भावनिक साद घातली. ग्रामपंचायत स्थापनेपासून आजतागायत काळे गटाचा झेंडा कायम फडकवण्यासाठी नेत्यांचे आदेश मानून कार्यकर्ते जिवाचे रान करत सत्ता काबीज करण्यात आजपर्यंत यशस्वी होत आले आहेत. सत्ता राहणार कि जाणार? यासाठी काही क्षणाचा अवधी बाकी राहिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या