Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरकोल्हार भगवतीपूरची बाजारपेठ आता पूर्णवेळ सुरू

कोल्हार भगवतीपूरची बाजारपेठ आता पूर्णवेळ सुरू

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

लॉकडाऊनच्या कचाट्यातून कोल्हार भगवतीपूरच्या व्यापार्‍यांची सुटका झाली. काल सोमवारी अप्पर जिल्हाधिकारी संदीप निचित यांना कोल्हार भगवतीपूर येथील करोना रुग्णसंख्या 10 पेक्षा कमी असल्यासंबंधी निवेदन देण्यात आले. त्या अनुषंगाने येथील व्यापारी बाजारपेठ पूर्णवेळ सुरू ठेवण्यास त्यांनी परवानगी दिली आणि येथील व्यापार्‍यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

- Advertisement -

कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर खर्डे, उपाध्यक्ष अनिल हिरानंदानी, व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी यांनी अहमदनगर येथे अप्पर जिल्हाधिकारी संदीप निचित यांची भेट घेतली. यावेळी व्यापारी संघटना व कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतच्यावतीने संयुक्तरीत्या त्यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार कोल्हार येथील व्यवसाय गेल्या 10 दिवसांपासून सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेमध्ये सुरु आहेत. त्याअगोदर 10 दिवसांसाठी गावातील सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले होते. गेल्या 15 दिवसांपासून कोल्हार बुद्रुक येथील कोविड रुग्णसंख्या 10 च्या आत आलेली आहे. त्यातच दीपावलीचा सण सुरु होणार असल्याने व्यापार्‍यांना वेळेच्या बंधनामुळे मोठी आर्थिक हानी होत आहे. व्यापार्‍यांचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन व कोविड रुग्णांची कमी झालेली संख्या विचारात घेऊन दुकाने पूर्णवेळ सुरु ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

त्यापश्चात अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी कोल्हार भगवतीपूर बाजारपेठेतील दुकाने पूर्णवेळ सुरू करण्यास परवानगी दिली. त्यासोबतच दुकानदारांनी पालन करावयाच्या सूचना त्यांनी दिल्या. दुकानदारांनी सक्तीने मास्क वापरणे तसेच दुकानांमध्ये मास्क वापरण्यासंबंधी फलक लावणे. सोशल डिस्टन्सिंग तसेच सॅनीटायझरचा वापर या सूचना देण्यात आल्या. यासोबतच जिल्हाधिकारी कामानिमित्त कधीही बाजारपेठेत येऊ शकतात. कोविड नियमांचे उल्लंघन झालेले त्यांना आढळल्यास सदर दुकान महिनाभर सील होऊ शकते. याची संपूर्ण जबाबदारी दुकानदारावर असेल. त्यामुळे दुकानदारांनी करोना नियमांचे पालन सक्तीने करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोल्हार भगवतीपूरच्या व्यापारी बाजारपेठेला मोठा फटका बसला. गेल्या 20-22 दिवसांपासून कधी पूर्णवेळ तर कधी अर्धवेळ लॉकडाऊन सोसावा लागला. ऐन नवरात्रोत्सवात येथील बाजारपेठ 10 दिवस पूर्णवेळ बंद होती. त्यानंतर दुपारी 4 वाजेपर्यंत दुकानांना सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली. या अनुषंगाने व्यापार्‍यांना आर्थिक झळ सोसावी लागत होती.

सातत्याने होणार्‍या लॉकडाऊनमुळे कोल्हार भगवतीपूरच्या व्यापार्‍यांची घुसमट होऊ लागली होती. त्यातून असंतोष बाहेर पडू लागला होता. नवरात्रोत्सवाच्या काळात लॉकडाऊन उठविण्यासंबंधी आ. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची येथील व्यापार्‍यांनी भेट घेतली होती. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी व राहाता तहसीलदार यांची भेट घेऊन व्यथा मांडण्यात आली मात्र लॉकडाऊन हटविण्यात आला नाही.

येथील शिवकुमार जंगम यांनी यासंदर्भात स्व. माधवराव खर्डे पाटील चौकामध्ये दोन वेळा व्यापार्‍यांची बैठक घेतली. रुग्णांची संख्या कमी होऊन देखील येथील लॉकडाऊन उठविला जात नसेल तर होणार्‍या परिणामाची तमा न बाळगता व्यापार्‍यांनी एकसंघ होऊन दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मात्र आता अप्पर जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिल्यामुळे टोकाची भूमिका घेण्याची गरज उरली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या