Friday, April 26, 2024
Homeनगरगुन्हेगार पठारेला उशीरा अटक, तोफखान्याचे पोलीस अधिकारी चौकशीच्या फेर्‍यात

गुन्हेगार पठारेला उशीरा अटक, तोफखान्याचे पोलीस अधिकारी चौकशीच्या फेर्‍यात

अहमदनगर|Ahmedagar –

शहरात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार विजय राजू पठारेला लवकर अटक केली नाही, चाकू हल्ला केल्यानंतर देखील सुरूवातीला किरकोळ मारहाणीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर खूनाच्या प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केल्याने तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी चौकशीच्या फेर्‍यात अडकले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठांकडून चौकशी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याला दुजोरा दिला.

- Advertisement -

तत्कालीन पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी गुन्हेगार विजय पठारे याला जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते. तडीपार असतानाही त्याने नगर शहरात येत अनेक गुन्हे केले. काही दिवसांपूर्वी त्याच्या टोळीने भरदिवसा बालिकाश्रम रोडवरील दोन दुकानावर दरोडा टाकला होता. यानंतर तो पसार झाला होता. त्याला अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले नव्हते. यानंतर त्याच्या टोळीने मागील आठवड्यात सिद्धार्थनगरमधील एकाला मारहाण करत चाकू हल्ला केला. यानंतर तो पसार झाला होता. पोलिसांनी किरकोळ मारहाणीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या घटनेची दखल घेत खूनाच्या प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तरीही पोलिसांना तो सापडत नसल्याने अधीक्षक पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने पठारेसह त्याचा साथीदाराला पुण्यातून अटक केली. वरिष्ठांच्या आदेशानंतर पठारे याला पोलिसांनी जेरबंद केले. तडीपार गुन्हेगार शहरात येत दहशत निर्माण करतो, लोकांवर दिवसा चाकू हल्ला करतो व पसार होतो. पोलिसांना तो सापडत का नाही. वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतरच का सापडतो. हा सर्व तपास संशयाचा भवर्‍यात सापडला आहे. यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तोफखान्याच्या प्रभारी अधिकार्‍यांसह दोन निरीक्षकांची चौकशी करण्याचे आदेश दिले. अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी ही चौकशी करून त्यांचे जबाब नोंदविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

………

पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे लक्ष

तडीपार असताना पठारे याने शहरात येत गुन्हे केले. दोन ठिकाणी दरोडा टाकल्यानंतरही पोलिसांना तो सापडला नाही. त्यानंतर त्याने चाकू हल्ला केला. चाकू हल्ला केल्यानंतरही किरकोळ गुन्हा दाखल करून तोफखान्याच्या अधिकार्‍यांनी गुन्हेगाराची पाठराखण केल्याचे सर्वांसमोर आले. वरिष्ठांनी आदेश देताच पठारेला अटक करण्यात आली. हे सर्व प्रकरण संशयाच्या भवर्‍यात अडकले आहे. यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले. याबाबत त्यांना विचारले असता चौकशी सुरू आहे. अहवाल माझ्यापर्यंत आला नाही. आल्यावर यावर निर्णय घेण्यात येईल. यामुळे अधीक्षक काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या