IPL21 : केकेआर पराभवाच्या दुष्टचक्रातून बाहेर येणार?

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२१ मध्ये आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीने हा सामना महत्वाचा असणार आहे.

या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. सलामी सामन्यात सनराईझर्स हैद्राबादवर मात करून कोलकाताने यंदाच्या हंगामात दणक्यात सुरुवात केली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर , चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्याविरुद्ध झालेल्या पराभवातून सावरून विजयी ट्रॅकवर येण्यासाठी कोलकाता संघाने जय्य्त तयारी सुरु केली आहे.

सलामी सामन्यात ८० धावांची खेळी करणारा नितीश राणा, मागील चार सामन्यांमध्ये सपशेल अपयशी ठरला आहे. त्याचा साथीदार शुभमन गील मागील पाच सामन्यांमध्ये केवळ ८० धावाच काढू शकला आहे. राहुल त्रिपाठी आणि दिनेश कार्तिक यांनी रचलेल्या भागीदारीमुळे कोलकात्याला राजस्थानविरुद्ध १३३ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली होती. सुमार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे कोलकाता संघाला पराभव टाळता आला नाही.

राजस्थान आणि चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध संथ सुरुवातीचा फटका कोलकाता नाईट रायडर्स संघाला चांगलाच महागात पडला आहे. आता पंजाबविरुद्ध लढतीत कोलकाता संघाची आघाडीची फलंदाजी फॉर्मात परतणार का ? आणि कर्णधार ऑईन मॉर्गनला आपली लय कधी गवसणार ? असा प्रश्न कोलकाता संघाच्या समर्थकांमध्ये निर्माण झाला आहे.

कोलकाता संघाच्या फलंदाजी क्रमातही काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. सलामीला शुभमन गील आणि सुनील नारायण येण्याची शक्यता आहे. मागील २ लढतींमध्ये त्याला मधल्या फळीत पाठवण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचे प्रकर्षाने दिसून आले आहे. त्यामुळे पंजाबविरुद्ध सामन्यात कोलकाता संघाचा पराभवाचा तिढा कसा सुटणार ? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तेज गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा जागी हरभजनसिंग संघात परतण्याची शक्यता आहे.

पंजाब संघाबद्दल सांगायचे झाले तर कर्णधार लोकेश राहुल , दीपक हुडा , मयंक अगरवाल फॉर्मात आहेत. युनिव्हर्स बॉस क्रिस गेलपासून कोलकाता संघाला सावध राहावे लागणार आहे. कारण आपल्या अखेरच्या सामन्यात मुंबईविरुद्ध ४३ धावांची झुंजार खेळी करणारा क्रिस गेल फॉर्मात परतला आहे.

मुंबईविरुद्ध चेन्नईतील सामन्यातील विजयाने आत्मविश्वास उंचावलेला पंजाब संघ कोलकाता संघाला पराभवाची धूळ चारण्यासाठी सज्ज आहे. पंजाब संघाची मुंबईविरुद्ध सामन्यात निर्णयक ठरली आहे. अर्शदिपसिंग , मोझेस हेन्रीक्स, रवी बिष्णोई यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे पंजाबने मुंबईला २० षटकात १३१ धावत रोखले होते. कोलकात्याविरुद्ध आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीत सातत्य राखण्यासाठी पंजाब सज्ज आहे.

– सलिल परांजपे, नाशिक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *