Friday, April 26, 2024
Homeनाशिक‘किसान पार्सल रेल्वे’ ठरली मोलाची

‘किसान पार्सल रेल्वे’ ठरली मोलाची

नाशिकरोड । Nashikroad l दिगंबर शहाणे

शेतकर्यांचे उत्पन्न वाढावे तसेच छोट्या शेतकरी व व्यापार्यांच्या गरजा भागविण्यासाठी कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालयाने किसान रेल्वेगाडी सुरू केली. गेल्या महिन्यात सुरू झालेल्या या रेल्वेगाडीच्या माध्यमातून केंद्र शासनाला आत्तापर्यंत शेतमालाच्या वाहतुकीतून सुमारे 63 लाख 61 हजार 714 रुपये एवढा महसूल मिळाला आहे.

- Advertisement -

कृषी मंत्रालय व रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या या किसान रेल्वे गाडीचे एक प्रकारे फलित झाले आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. करोना संकटामुळे सर्वत्र आर्थिक कुचंबणा असताना शेतकर्यांच्या मालाला वाजवी भाव मिळावा तसेच शेतकर्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल राज्यासह देशाच्या कानाकोपर्यात पोहचावा, यासाठी कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालयाने देशातील पहिली किसान रेल्वे सुरू केली.

गेल्या महिन्यात 7 ऑगस्ट रोजी या किसान रेल्वेचे उदघाटन झाले. आतापर्यंत या किसान रेल्वेगाडीच्या 12 फेर्या झाले असून त्यातून रेल्वे प्रशासनाला आत्तापर्यंत सुमारे 63 लाख 61 हजार 714 इतका महसूल मिळाला आहे.

या रेल्वेगाडीला देवळाली ते मनमाड या स्थानकादरम्यान दहा बोगी असून त्यानंतर मनमाडहुन आणखी दहा बोगी लावण्यात येतात. अशा वीस बोगी घेऊन ही गाडी शेतकरी व व्यापार्यांचा शेतमाल वाहून नेते.

या रेल्वेगाडीला महाराष्ट्रात प्रमुख्याने नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ असे थांबे असून त्यात आता दि.17 ते 26 सप्टेंबर या कालावधीसाठी प्रायोगिक तत्वावर लासलगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

सुरुवातीला ही रेल्वे गाडी आठवड्यातून एकच दिवस धावत होती. त्यानंतर शेतकरी व व्यापार्यांच्या वाढत्या मागणीनुसार दोन दिवस करण्यात आली. त्यानंतर पुन्हा आणखी एक दिवस वाढविण्यात आला त्यामुळे आता ही रेल्वे गाडी आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस धावते.

या रेल्वेगाडीतून उत्तर महाराष्ट्रातून डाळिंबाची सुद्धा वाहतूक करण्यात येत असून रस्त्यापेक्षा स्वस्त आणि टोलसह वाहतूक खर्चात बचत होत असल्याने शेतकरी व व्यापार्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. तसेच कमी वेळेत मालवाहतूक करण्यासाठी ही रेल्वे गाडी फायदेशीर ठरत आहे.

सुरुवातीला ही गाडी देवळाली बस स्थानक ते दानापूर या रेल्वेस्थानकापर्यंत होती. परंतु आता ही गाडी थेट मुजफ्फरपुरपर्यंत धावत आहे. शेतकरी व व्यापारी यांच्या वाढत्या मागणीनुसार या रेल्वेचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील शेतकर्यांचे जीवन बदलत आहे

शेती उत्पादनांचे नुकसान होऊ नये आणि शेतकर्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी किसान रेल महत्त्वपूर्ण ठरली आहे. ग्राहकांनाही ताजा व स्वस्तातील माल मिळत आहे. छोट्या शेतकरी आणि व्यापार्यांच्या गरजा भागविणारी ही किसान रेल महत्वाची ठरत आहे.

मध्य रेल्वे आपल्या व्यवसाय विकास युनिटच्या माध्यमातून स्थानिक शेतकरी, लोडर्स, एपीएमसी आणि व्यक्तींशी मार्केटिंग करून त्यांच्या मागण्या एकत्रित करत आहे.

शेतकर्यांनी माल पॅक करून तो जवळच्या पार्सल ऑफिसमध्ये आणावा. सोबत आधार कार्डची झेरॉक्स ठेवावी. शेतकरी, कार्गो अ‍ॅग्रीग्रेटर, व्यापारी, बाजार समिती, आणि लोडर्स यांनी जवळच्या स्टेशन मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याकडे संपर्क करावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या