व्यवहारातून चौघांचे अपहरण करणारे दोघे अटकेत

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आर्थिक व्यवहारातील पैशांच्या देवाण घेवाणीतून चौघांचे अपहरण करणार्‍या दोघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली. माधव उर्फ मनिष काशिनाथ ठुबे (वय 38) व दत्तात्रय मारूती हजारे (वय 25 दोघे रा. शिवाजीनगर, केडगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील चौघे पसार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. अपहृत तिघांची पोलिसांनी सुटका केली असून एकाचा शोध सुरू आहे.

आर्थिक व्यवहारातील पैशांच्या देवाण घेवाणीतून चौघांचे अपहरण झाल्याचा प्रकार सोमवारी (दि.23) दुपारी उघडकीस आला. याप्रकरणी अजय बाळासाहेब जगताप (रा. गोकुळनगर, भिस्तबाग) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून माधव उर्फ मनिष ठुबे, अंतू वारूळे (रा. वारूळवाडी), सीए दत्ता हजारे, दत्ता भगत, एक अनोळखी व्यक्ती व अस्मिता जिम ट्रेनर (पूर्ण नाव, पत्ता नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील ठुबे व हजारे यांना अटक करण्यात आली आहे. अपहृत तिघांची सुटका करण्यात आली असून बाळासाहेब गंगाधर जगताप यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अजय जगताप यांनी मनीष ठुबे याच्याशी साडेतीन कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा करारनामा केला होता. मात्र, मनिष ठुबे यांनी 2.15 कोटी व तीन सदनिका दिल्या. ठुबे याला पैसे पाहिजे असल्यास तीन महिने आगोदर कळवणे बंधनकारक राहील, असे ठरले होते. मात्र, जुलै महिना अखेर ठुबे याने संपूर्ण पैशाची मागणी केली. 13 ऑक्टोबर रोजी रात्री शिर्डी येथील सिझन चॉईस येथे मनीष ठुबे व इतरांनी येऊन अजय जगताप, त्यांची आई जयश्री, वडील बाळासाहेब व चुलतभाऊ मनोज यांना घेऊन केडगाव येथे आरएमटी इमारतीच्या खालच्या मजल्यावर जिम ट्रेनर अस्मीता हीच्या रूममध्ये ठेवले. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी मनोज जगताप याला सोडून दिले. त्यानंतर तोफखाना पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिघांची सुटका केली असून दोघांना अटक केली आहे.अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *