Friday, April 26, 2024
Homeनगरखोकर स्मशानभूमीतील नवीन ग्रामपंचायत इमारतीची जागा वादात?

खोकर स्मशानभूमीतील नवीन ग्रामपंचायत इमारतीची जागा वादात?

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील नवीन ग्रामपंचायत इमारत गावालगतच्या स्मशानभुमी कंपाऊडच्या आत घेण्याचा निर्णय ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी घेतला असला तरी ही जागा वादात गेल्याने पेच निर्माण झाला आहे. अनेकांकडून विरोध होत असल्याने आता या नवीन ग्रामपंचायत इमारतीचे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

येथील सेनेच्या कार्यकर्त्यांनी खा. सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून अद्यावत ग्रामसचिवालयासाठी साडेआठ लाख रुपये निधी मंजूर केला. त्यावेळी त्या इमारतीसाठी असलेल्या नियोजीत जागेत वै. चौरंगीनाथ महाराज यांचे सौजन्याने प्राथमिक आरोग्य उपकेंद्राजवळील जागेत भुमीपुजनही झाले होते. गेल्या महिन्यात झालेल्या विशेष बैठकीत काही सदस्यांनी तर काही महिला सदस्यांच्या पतींनी वेगवेगळ्या जागा सुचविल्या. अखेर रावसाहेब उर्फ आबा पवार सुचक असलेल्या ठरावास उपसरपंच दिपक काळे यांनी अनुमोदन देत नवीन ग्रामपंचायत इमारत गावालगतच्या स्मशानभुमीच्या संरक्षक भिंतीच्या आत करण्याच्या ठरावास मंजूरी देण्यात आली. त्यानंतर एप्रिलच्या अखेरीस झालेल्या मासिक बैठकीत बहुमताने ठराव कायम करण्यात आला.

यापुर्वी हिच जागा दाखवून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत मंजूर करण्यात येवून येथे बाळंत झालेल्या महिला स्वत: किंवा आपल्या बालकाला घेवून येणार नाही म्हणून स्थानिक पातळीवर जागा बदलण्यात आली. ती इमारत वै. चौरंगीनाथबाबा यांच्या सल्ल्याने त्यांचेच जागेत झाली. त्याप्रमाणे आताही इतरत्र जागेत नवे ग्रामसचिवालय होईल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. ई टेंडरनुसार प्रत्यक्षात कामास सुरूवात झाली. येथे खडी व वाळू येवून पडली, खड्डे खणण्यास सुरूवात झाली. हे समजताच या जागेस विरोध सुरू झाला.

अशोक कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव जाधव, सोसायटीचे अध्यक्ष रेवणननाथ भणगे, सरपंच पती रावसाहेब चक्रनारायण, माजी सरपंच लक्ष्मण चव्हाण, विद्यमान सदस्य राजू चक्रनारायण, आबा पवार व बाळासाहेब सलालकर आदिंनी सार्वजनीक बांधकाम खात्यास या स्मशानभुमी संरक्षक भितीच्या आत नवीन ग्रामसचिवालय झाल्यास ते बंद पाडण्याचा इशारा दिला. त्यास विद्यमान सरपंच आशाताई चक्रनारायण यांनी पुष्टी देत येथे कार्यालय इमारत बांधण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याने काम बंद करावे अन्यथा तेथेच आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून सर्वानुमते जी जागा ठरेल, त्याप्रमाणे पत्राद्वारे कळविले जाईल, असे सरपंच सौ. चक्रनारायण यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यास कळविले आहे.

गावकरी निर्णय घेतील त्यास आमची मान्यता आहे – पवार

गावच्या स्मशानभुमी संरक्षक भिंत असलेली जागा एक एकर चार गुंठे आहे, त्यातील चार गुंठ्यात ग्रामपंचायत कायार्र्लय बांधकाम करून त्यास आठ फुट उंचीची संरक्षक भिंत बांधण्याचे नियोजन केले असून उर्वरीत एक एकर जागा स्मशानभुमीसाठी राहणार आहे. हा विचार करून सर्वानुमते जागा निश्चीत केली, परंतू यास ग्रामस्थांचा विरोध असल्यास ग्रामस्थ सुचवतील तेथे बांधकाम करण्याची तयारी असल्याचे ठरावाचे सुचक रावसाहेब उर्फ आबा पवार यांनी सांगितले.

हिंदूच्या स्मशानूमीत इतर कुठलेही बांधकाम होवू देणार नाही – भणगे

आम्ही गावच्या विकासासाठी खा. सदाशिव लोखंडे यांचे उंबरे झिजवून स्व. मिनाताई ठाकरे यांचे निधीतून हा निधी आणला, त्यावेळी तत्कालीन सरपंच रामचंद्र पटारे यांनी भुमीपुजन केल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत, त्यामुळे जागा बदलण्याचे कारण नाही. ती जागा हिंदुची स्मशानभुमी म्हणून आरक्षीत आहे, त्या जागेचा वापर केवळ अंत्यविधीसाठीच होईल, तेथे कुठल्याही प्रकारचे बांधकाम होवू दिले जाणार नाही, अन्यथा त्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा ज्येेष्ठ शिवसैनिक व माजी शाखा प्रमुख कैलास भणगे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या