Friday, April 26, 2024
Homeनगरखोकर येथील ओढ्यात आढळले देशी दारूचे खोके व बाटल्या

खोकर येथील ओढ्यात आढळले देशी दारूचे खोके व बाटल्या

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील खोकर शिवारातील ओढ्यात बेवारस देशी दारूचे विखुरलेले बॉक्स, भरलेल्या व रिकाम्या बाटल्या आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्षांसह ग्रामस्थ येईपर्यंत या दारूवर अनेकांनी ताव मारल्याची चर्चा परीसरात सुरू आहे.

- Advertisement -

खोकर गावापासून काही अंतरावर खोकर-निपाणीवाडगाव रोडवर असलेल्या गोरक्षनाथ बंधार्‍याजवळील पुलाखाली बेवारस स्थितीत देशी दारूचे (भिंगरी, संत्रा) काही बॉक्स विखुुरलेल्या अवस्थेत पडलेले नागरिकांनी पाहिले. ही बातमी वार्‍यासारखी गावात तसेच पोलीस पाटील डॉ. अनिकेत चव्हाण व तंटामुक्तीचे अध्यक्ष पोपटराव जाधव यांचेपर्यंत पोहचली. डॉ. चव्हाण यांनी तालुका पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस उपनिरीक्षक संजय निकम, पोलीस हेड काँन्स्टेबल अर्जुन बाबर, पोलीस नाईक संतोष बडे व पोलीस काँन्स्टेबल संभाजी वारे यांनी भेट देत दारू ताब्यात घेत पोलीस ठाण्यात जमा केली.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल संभाजी वारे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा र. नं. 148/2023, दारूबंदी कायदा कलम 65(ई) नुसार अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष बढे करत आहेत. घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल होईपर्यंत पोलीस पाटील डॉ. अनिकेत चव्हाण यांनी त्या बेवारस दारूची रखवाली केली. या ठिकाणी भिंगरी संत्राचे चार बॉक्स मध्ये 180 मिलीच्या 92 बाटल्या असे मिळून तेरा हजार चारशे चाळीस रुपये किंमतीची दारू आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हा प्रकार उघड झाल्यानंतर काहींनी हात साफ केल्याचे चर्चा परीसरात सुरू असून तालुका पोलिसांचा त्यादृष्टीने तपास सुरू आहे. त्याचबरोबर ही दारू कुठून आली, या ठिकाणी टाकण्याचे कारण काय? या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे तर दुसरीकडे ही दारू चांगली होती की वेगळा काही प्रकार होता? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या