दहा महिन्यांपासून खेरवाडी रेल्वेफाटक बंदच

jalgaon-digital
4 Min Read

खेरवाडी । वार्ताहर Kherwadi-Niphad

प्रलंबित पडलेल्या उड्डाण पुलाच्या (Flyover) कामामुळे गेली दहा महिन्यापासून येथील रेल्वे गेट (Railway gate) क्रमांक 95 कायमचे बंद केल्याने विद्यार्थी (students) व वृद्धांना जीव मुठीत धरून रेल्वे लाईन ओलांडावी लागत असल्याने व दोन तीन विद्यार्थी व वृद्ध रेल्वे अपघातातून (Railway accident) बालंबाल बचावल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे येथे तत्काळ उड्डाणपुलाचे काम सुरू करावे अन्यथा त्याबाबत तीव्र आंंदोलन (Movement) छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

येथील रेल्वे लाईन (Railway line) ही गावाच्या मध्यभागावरून गेली असल्याने गाव दुभंगले जाऊन अंगणवाडी (Anganwadi), जि.प. शाळा (zp school), माध्यमिक विद्यालयाच्या (college) विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, तसेच ज्येष्ठ नागरिक व वृद्धांना देवदर्शन व दवाखान्यात जाण्याबरोबरच ग्रामस्थांना बाजार, किराणा माल, दूध, भाजीपाला, अंत्यविधी, दशक्रिया विधी आदी कामांसाठी रेल्वे लाईनच्या पलिकडे जावे लागते.

त्यातच आता उड्डाणपूलाच्या नावाखाली रेल्वे गेट बंद केल्याने अवघ्या 30 फुटाच्या अंतरासाठी नागरिकांना दीड कि.मी. चा हेलपाटा मारावा लागत असल्याने यात वेळ, पैसा आणि श्रम यांचा अपव्यय होत आहे. रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी येथील रेल्वे फाटक कायमचे बंद करण्यापूर्वी पादचार्‍यांना रेल्वे लाईन ओलांडण्यासाठी पर्यायी सोय करणे गरजेचे होते. तसे लेखी आश्वासन रेल्वे प्रशासनाने ग्रामस्थांना दिले होते.

परंतु केवळ उड्डाणपूलाचे भुमिपूजन (bhumipujan) करून व रेल्वे फाटक बंदं करून रेल्वे प्रशासनाने येथील ग्रामस्थांच्या निवेदनाला (memorandum) केराची टोपली दाखविली आहे. सुमारे दहा महिन्यापासून येथील रेल्वे फाटक बंद असल्याने स्थानिक नागरिक, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यवसायिक, चाकरमाणी, प्रवासी यांना नानाविध संकटांचा सामना करावा लागत आहे. तसेच शेतमाल वाहतूकीला देखील अडचणी येत आहेत.

रेल्वे फाटक बंद झाल्याने या मार्गावर धावणारी बससेवा देखील बंद झाली असून ओझर-सायखेडा मार्गावर धावणारी खासगी वाहने देखील रेल्वे फाटक बंंद झाल्याने बंद पडली आहे. त्यामुळे येथील व्यवसायिकांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे रेल्वे रूळापलिकडील राहणार्‍या नागरिकांंना गावात येण्यासाठी व गावातील नागरिकांना किराणा साहित्य घेण्याबरोबरच शाळा, दवाखाने व वस्तीवर जाण्यासाठी सुमारे 2 कि.मी. चा हेलपाटा मारावा लागत आहे.

रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना नित्याचाच बसत असून उड्डाणपूलाचे काम त्वरीत सुरू करावे या मागणीसाठी उड्डाणपुलाचे प्रकल्प व्यवस्थापक व संबंधित रेल्वे विभागाचे अधिकारी यांना तसेच नामदार भारती पवार, रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांंनाही निवेदने देण्यात आली आहे. परंतु अद्यापपर्यंत यावर कुठलीही कारवाई झाली नाही. रेल्वे प्रशासनाकडे फोन केला तर फोन उचलला जात नाही. नजरचुकीने उचलला गेला तर पुढील आठवड्यात काम सुरू करू अशी उत्तरे दिली जातात.

परंतु गेल्या चार महिन्यापासून रेल्वे प्रशासनाचा मात्र पुढील आठवडा काही येत नाही अन् काम काही सुरू होत नाही. त्यामुळे संतप्त नागरिक आता रेल्वे प्रशासनाविरोधात जनहित याचिका दाखल करण्याच्या विचारात असून सन 1980 साली देशभर गाजलेल्या येथील शेतकरी रेलरोको आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरीत उड्डाणपुलाचे काम सुरू करावे अन्यथा त्याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील, बी.जी. पाटील,

भाऊसाहेब लगड, पी.के. पाटील, आर.डी. आवारे, संदीप पवार, योगिता आवारे, शंकर संगमनेरे, सतिष संगमनेरे, सोमनाथ संगमनेरे, शैलेश शेलार, प्रभाकर बुरके, अशोक आहेर, संजय बुब, अनिल आवारे, दिलीप संगमनेरे, भाऊसाहेब पोपट आवारे, रमेश संगमनेरे, बाळेश्वर पगारे, मधूकर आवारे, कैलास आवारे, माथाडी कामगार, सरपंच, उपसरपंच आदींसह ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *